Join us

वाढत्या उन्हाचा परिणाम, नाशिक जिल्ह्यात फळबागांवर आच्छादन करण्याची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 6:04 PM

उन्हापासून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

नाशिक : सध्याच्या वाढत्या तापमानामुळे फळबागांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून फळबागांचे संरक्षण कारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आच्छादन टाकण्यास सुरवात केली आहे. या आच्छादनाने तरी फळबागांना सुरक्षितता मिळण्यास मदत होईल, अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे. 

वाढत्या उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे निफाड तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, रुई, धारणगांव खडक, कोळगांव, बोकडदरे परिसरातील शेतकरी पूर्वीपासून फळबागायतदार आहेत. तसेच या परिसरामध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात गोदावरी नदीचे पात्र तसेच डावा कालवा, पालखेड कालवा जात असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीसह फळबागा लावलेल्या आहेत. सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उन्हाचा देखील मोठा फटका बसत आहे. 

निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील युवा शेतकरी संदिप आणि योगेश रमेश घोटेकर यांच्या खेडलेझुंगे शिवारातील साडेतीन एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. विहीरीतील जेमतेम पाण्यावर त्यांनी फळबाग जपली आहे. वाढत्या उन्हापासून डाळिंबाची बागा संरक्षित करण्यासाठी आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून  घोटेकर यांनी आच्छादन लावून बागा जगविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जवळपास साडेतीन एकर क्षेत्रातील बागेला नेटने आच्छादन पसरविले आहे. यामुळे वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचण्यास मदत होणार आहे. तसेच बाग वाचविण्यासाठी सुधारित पद्धतीच्या आच्छादनाचा वापर करता येत असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

अपेक्षित बाजारभाव मिळणे आवश्यक... 

शेतकरी दिलीप घोटेकर म्हणाले की, डाळिंब बागांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी गरजेनुसार जुन्या साड्या, कापड याचा वापर करतात.  परंतु वादळी वारा, किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे सद्य किंवा इतर कापड फाटून जाते. म्हणून चांगल्या प्रतीच्या नेटचा वापर करुन डाळिंब बागेला अच्छादन देऊन फळबागा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मोठा खर्च येत असून योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. शेतकरी वर्ग आपले पीक वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो मात्र त्याला शासनाने साथ देणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :शेतीतापमाननाशिकडाळिंब