Onion Nursery Management : राज्यात खरीप, रांगडा, रब्बी तीनही हंगामात कांदा उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांकडून रांगडा कांदा रोपवाटिका व्यवस्थापनाचे काम सुरु आहे. अशावेळी हे व्यवस्थापन कसे करावे, रोपवाटिका तयार करताना काय काळजी घ्यावी, हे लेखातून समजून घेऊया...
रांगडा हंगामासाठी ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात बी पेरून रोपांची पुर्नलागवड (Onion Nursery) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. एक एकर कांदा लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. एक एकर लागवडीसाठी दोन ते तीन किलो बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपूर्वी २०० किलो शेणखतासोबत ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरून जमिनीत मिसळावे.
रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून १० ते १५ सें.मी. उंच, १ ते १.२ मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
वाफे तयार करताना
- वाफे तयार करताना १६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ४०० ग्रॅम पालाश प्रति २०० वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत.
- रुंदीशी समांतर ५-७.५ सें.मी. अंतरावर रेघा पाडून १-१.५ सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे.
- पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे.
- नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे.
- तण नियंत्रणासाठी रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथैलीन २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून, ८०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.
संकलन : ग्रामीण कृषि मौसम विभाग वेधशाळा विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक.