नागपूर : नागपूरच्या कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच पाण्याचे सुयोग्य निययोजन करत फुलशेती फुलवली आहे. या तालुक्यातील पवनगाव, धारगाव, लिहिगाव, खेडी टेमसना, भूगाव, चिखली, गुमथळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलशेतीचे नियोजन केल्याने, तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल फुलशेतीकडे असल्याचे दिसत आहे.
गेल्या पाच वर्षापासून सतत सोयाबीन, पराटी व धान पिकावर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी कंटाळला असून पारंपरिक पिकांसोबतच दोन पैसे ज्यादा देणाऱ्या फुलशेतीकडे त्याचा कल आहे. यावर्षी तालुक्यात २५५ हेक्टरमध्ये फुलशेतीचे नियोजन असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. उपराजधानीला लागून कामठी तालुक्याचा मोठा भाग आहे. त्यामुळे फुलबाजार जवळ असल्याने, पवनगाव, धारगाव, लिहिगाव, गुमथळा, टेमसना, यकीं, सेलू खेडी, भूगाव, चिखली, वडोदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडू, शेवंती, लीली, गुलाब, मोगऱ्याचे नियोजन केले असून, शेती फुलून आली आहे.
कोरोनाकाळात विरजण
कोरोना संक्रमण काळात बाजारपेठा व उत्सव बंद असल्याने फुलांना मागणी नव्हती. फुलशेतीवर विरजण पडल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फुलशेतीवर ट्रॅक्टर चालवावा लागला होता. आता काळ बदलला आहे. परिस्थिती उत्तम असून, शेतकऱ्यांनी लीली, झेंडू, शेवंती व गुलाब फुलांची शेती केली आहे.
चांगले उत्पादन मिळण्याची आशा
गुंमथळा येथील सदस्य योगेश डाफ म्हणाले की, दसरा-दिवाळीमध्ये फुलांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. उत्पादन जास्त झाल्याने भाव पडले होते. मात्र, नुकसान झाले नाही किंवा अवकाळीचा फटका फुलशेतीला बसला नाही. तर पवनगाव येथील माजी सरपंच किरण राऊत म्हणाले कि, इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीतून उत्पन्न चांगले होते. कमी खर्चात फुलशेतीतून चांगले उत्पादन मिळण्याची आशा बळावली आहे.