Rabbi Fodder Crop : दूग्ध व्यवसायात (Milk Business) चारा पिक उत्पादनास (Rabbi Fodder) खूप महत्त्व असते. दुभत्या जनावरांना हिरवा चारा, वाळलेला चारा व खाद्य मिश्रणाचा समावेश नियमित आहार पुरवठा करावा लागतो. चारा पिकांचे वर्गीकरण दोन प्रकारे होते. त्यामध्ये एकदल चारापिके व द्विदल चारापिके. एकदल चाऱ्यामध्ये ज्वारी, मका इत्यादी (Maize, Jawar) तसेच द्विदल चारा पिकांमध्ये ल्यूसर्न (लसूण घास), बरसीम (मेथी घास) ओट इत्यादी येतात. या लेखात चारा पिकांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
लसूण घास :
हे द्विदलवर्गीय चारा पिक असून यामध्ये प्रथिनांचे प्रमाण मुबलक असते (२० ते २३ टक्के).
जमीन मशागत : ट्रॅक्टर किंवा बैलाच्या सहाय्याने जमीन तयार करून जमीनीच्या सुपिकतेनुसार लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत हेक्टरी ५ टन याप्रमाणात मिसळावे.
बिजप्रक्रिया : प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबीयम हे जिवाणू संवर्धक वापरावे व बिज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून त्याचा वापर करावा.
वाण : पेरणीपूर्वी शुध्द व खात्रीशीर उगमाद्वारे बियाण्याची निवड करावी. पेरणीसाठी आनंद ३, आर.एल.८८ या वाणांचा वापर करावा.
पेरणीची वेळ : खरीप हंगामात जूनमध्ये पिक पेरणी केलेली असल्यास सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात काढणी करून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमीन तयार करून घ्यावी. पेरणी लवकरात लवकर ऑक्टोबरचा पहिला आठवडा ते उशीरा पेरणी नोव्हेंबरमध्ये करावी. एक नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्याद्वारे जमीन भूसभूशीत करून घ्यावी.
बियाणे (प्रति हेक्टरी) : बियाण्याचा आकार लहान असल्याने २५ ते ३० किलो बियाणे प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे.
पेरणीचे अंतर : पाभरीच्या सहाय्याने ओळीत पेरणी करावी. या पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याने पाण्याचा वापर योग्य प्रमाणात होण्याच्या दृष्टीने जमिनीच्या मगदूरानुसार हलक्या जमिनीत दोन ओळीतील अंतर २५ से.मी. तर मध्यम ते भारी जमिनीत दोन ओळीतील अंतर ३० से.मी. ठेवावे.
रासायनिक खते : जमिनीचे सुपिकतेनुसार व पिकाचे गरजेनुसार १५० कि.ग्रॅ. नत्र, १२० कि.ग्रॅ. स्फूरद व ४० कि.ग्रॅ. पालाश प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे.
कापणी : पहिली कापणी पेरणीपासून ५० ते ६० दिवसांनी व नंतरच्या कापण्या २५ ते ३० दिवसांनी कराव्यात.
चारा उत्पादन : हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ४० ते ४५ टन प्रति हेक्टर या प्रमाणात मिळते.
बरसीम (मेथी घास)
हे द्विदलवर्गीय चारापिक असून यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २० ते २३ असते.
वाण : मस्कावी, जेबी-२, एस-९१-१, वरदान
पेरणीची वेळ : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेरणी करावी.
बियाणे : बियाण्याचा आकार लहान असल्याने २० ते २४ कि.ग्रॅ. बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. पेरणीपूर्वी रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास पिक जोमाने वाढते.
पेरणीचे अंतर : पेरणी ओळीत करावी व दोन ओळीतील अंतर २५ ते ३० से.मी. ठेवावे.
रासायनिक खते : जमिनीच्या मगदुरानुसार १५ कि.ग्रॅ. नत्र, १२० कि.ग्रॅ. स्फूरद व ४० कि.ग्रॅ. पालाश प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे.
कापणी : पहिली कापणी पेरणीपासून ४५ ते ५० दिवसांनी व नंतरच्या कापण्या २५ ते ३० दिवसांनी कराव्यात.
चारा उत्पादन : हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ४० ते ४५ टन प्रति हेक्टर या प्रमाणात मिळते.
ओट :
हे एकदलवर्गीय चारापिक असून दिसायला नगदी धान पिकासारखे भरपूर फुटव्यासह पाला हिरवागार, रसाळ व रूचकर असतो. याचे बियाणेसुद्धा धान पिकासारखे असते. लसूण घास पिकाच्या तुलनेत यामध्ये प्रथिनाचे प्रमाण कमी असते (१० ते ११).
वाण : एच.ओ. ८१४, केंट ओ.एस.६ व ७, फुले हरिता, फुले सुरभी.
पेरणीची वेळ : पूर्व मशागत करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी करावयाची असल्यास नोव्हेंबरच्या पंधरवड्यात पेरणी करावी. मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन निवडावी.
बियाणे : बियाण्याचा आकार मोठा असल्याने प्रति हेक्टरी १०० ते ११० कि.ग्रॅ. बियाणे पेरणीस वापरावे. बियाण्यास अझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाचा बीजप्रक्रियेकरीता वापर करावा.
पेरणीचे अंतर : पेरणी ओळीत करावी व दोन ओळीतील अंतर २५ से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी एक नांगरट व दोन कुळव्याच्या पाळ्या देऊन जमीन भूसभूशीत करावी.
रासायनिक खते : एकूण नत्र ८० कि.ग्रॅ. प्रती हेक्टरी या प्रमाणात द्यावा, परंतु पेरणीच्या ३० दिवसानंतर एकूण नत्रापैकी अर्धा नत्र विभागून द्यावा. स्फूरद ३० कि.ग्रॅ. व पालाश २५ कि.ग्रॅ. या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत.
आंतरमशागत : पेरणीपासून एक महिन्याने एक खुरपणी करून पीक तणविरहीत करावे.
कापणी : पहिली कापणी पिक फुलोऱ्यावर असताना किंवा पेरणीपासून ४५ ते ५० दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापणी ४० दिवसांच्या फरकांनी कराव्यात. पिक कापणी करताना जमिनीपासून १० सें.मी. करावी.
उत्पादन : हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ४५ ते ५० टन प्रति हेक्टर या प्रमाणात मिळते.
मका :
हे एकदलवर्गीय चारा पिक असून सर्व हंगामात लागवड करण्यास योग्य आहे. यामध्ये ९ ते ११ टक्के प्रथीने असतात.
वाण : आफ्रिकन टॉल, गंगा-२,५, मांजरी कंपोझीट, पिकेव्ही एम शतक, विजय.
पेरणीची वेळ : मका हे सर्व हंगामात उत्पादीत करण्यात येणारे पिक असल्याने खरीप : जून-जुलै, रब्बी ऑक्टोबर-नोव्हेंबर,
उन्हाळी : फेब्रुवारी - मार्च या वेळेत पेरणी करावी.
पेरणी : मका चारा पिक लागवडीस मध्यम व भारी जमीनीची निवड करावी. एक नांगरट व कुळवाच्या पाळ्याद्वारे जमीन भूसभूशीत करून पाभरीच्या सहाय्याने ओळीत पेरणी करावी. दोन ओळीतील अंतर साधारणतः २५ ते ३० से.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी अॅझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाचा २५० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात वापर करून बिजप्रक्रिया करावी.
बियाणे : बियाण्याचा आकार मोठा असल्याने प्रति हेक्टरी ७५ कि.ग्रॅ. बियाण्याचा वापर करावा.
रासायनिक खते : जमिनीच्या सुपीकतेनुसार ८० किलो नत्र, ३० किलो स्फूरद व २० किलो पालाश या प्रमाणात खताचा वापर करावा.
कापणी : पिक ५० टक्के फुलोऱ्यात असताना किंवा पेरणीपासून ६५ ते ७० दिवसांनी हिरव्या चाऱ्याची कापणी करावी.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला