Join us

Rabbi Season : शेतकऱ्यांनो! रब्बी बागायती पिकांसाठी रानबांधणी कशी कराल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 8:17 PM

Rabbi Season : रब्बी बागायती (Rabbi Season Crops) पिकांसाठी योग्य प्रकारे केलेल्या रानबांधणीमुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

Rabbi Season : पिकांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार, विशिष्ट लांबी-रुंदीसह रानबांधणी करणे गरजेचे असते. रब्बी बागायती (Rabbi Season Crops) पिकांसाठी योग्य प्रकारे केलेल्या रानबांधणीमुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो. तसेच जमिनीची धूपही कमी होण्यास मदत होते.          भारी, मध्यम किंवा हलक्या जमिनीत सारे, वाफे किंवा सरी-वरंबा या रानबांधणीसाठी योग्य प्रमाणात लांबी/रुंदी ठेवल्यास शेतात पिकास पाणी समप्रमाणात मिळण्यास मदत होते, परिणामी पिकांची वाढ चांगली होते, तसेच पिकाचे उत्पादनही चांगले मिळते. 

सारे पध्दत :  या रानबांधणीच्या प्रकारामध्ये भारी जमिनीमध्ये साऱ्याची लांबी ९० ते १०० मीटर आणि रुंदी ३ मीटर ठेवावी. मध्यम जमिनीमध्ये साऱ्याची लांबी ७० ते ८० मीटर आणि रुंदी २.७० मीटर ठेवावी.  हलक्या  जमीनीत साऱ्याची लांबी ४० ते ५० मीटर आणि रुंदी २.५ मीटर ठेवावी. सारे या रानबांधणीच्या प्रकारात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, सूर्यफूल, करडई आणि चारा पिके घेता येतात.

वाफे पद्धत :  भारी जमिनीमध्ये वाफ्याची लांबी १० मीटर आणि रुंदी ५ मीटर ठेवावी. मध्यम जमिनीत वाफ्याची लांबी १० मीटर आणि रुंदी ५ मीटर ठेवावी.  हलक्या जमिनीत वाफ्यांची लांबी ८ मीटर आणि रुंदी ४ मीटर ठेवावी. वाफे या रानबांधणीच्या प्रकारात रब्बी हंगामात बरसीम, लसूणघास आणि पालेभाज्या घेता येतात.

सरी-वरंबा पद्धत :  भारी जमिनीमध्ये सरीची लांबी १०० मीटर आणि रुंदी ०.९० मीटर ठेवावी. मध्यम जमिनीमध्ये सरीची लांबी ५० ते ६० मीटर आणि रुंदी ०.७५ मीटर ठेवावी. हलक्या जमिनीत सरीची लांबी २५ ते ३० मीटर आणि रुंदी ०.४५ मीटर ठेवावी. सरी-वरंबा पद्धतीत रब्बी हंगामात हरभरा, कांदा, वांगी, कोबी व फ्लॅावर ही पिके घेता येतात.

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त शास्रज्ञ, कृषी विद्यापीठ

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीरब्बीगहू