एस. आर. टी. म्हणजे काय ?
सगुणा राईस तंत्र हे भातशेतीशी संबंधीत, नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायम स्वरूपी गादीवाफ्यावर टोकणणी करून भरघोस भात पिकविण्याचे नवे तंत्र तंत्र आहे. या पद्धतीत भात पिकानंतर थंडीमध्ये (नोव्हे.-फेब्रु.) पालेभाज्या, वाल, कांदा, कोबी, भेंडी, हुलगा, हरभरा, चवळी, मका, सूर्यफूल, गहू इ. व त्यानंतर उन्हाळ्यात (जाने. - मे.) वैशाखी मूग, भूईमुग, भेंडी, सूर्यफूल, सोयाबीन अशी फेरपालट पिके घेऊ शकतो. ही पद्धत सगुणा बाग, नेरळ, जि. रायगड येथे विकसित केली आहे.
एस. आर. टी. तंत्राचे वेगळेपण
या पद्धतीत वापरलेल्या गादिवाफ्यांमुळे भात रोपांच्या मुळाशी प्राणवायूचे सुयोग्य प्रमाण तसेच पुरेसा ओलावा (वाफसा) राहतो. साच्यामुळे दोन रोपांमधील नेमके आणि सुयोग्य अंतर व त्यामुळे प्रति एकर रोपांची संख्या नियंत्रित करता येऊ शकते. अगोदरच्या पिकाची मुळे जमिनीत जागेलाच ठेवल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब चटकन वाढतो. परिणामी रोग व किडींचा त्रास कमी होतो. तसेच विपुल प्रमाणात आपोआप गांडूळांचा संचार सुरु होतो. पारंपारिक चिखलणी भात लागवड पद्धतीमध्ये अनुरूप बदल करून हे तंत्र विकसित केले आहे. यामध्ये लावणीची पायरी नसल्यामुळे पावसाच्या लहरीपणाचा परिणाम होऊ शकत नाही म्हणजेच पावसाकडे डोळे लाऊन बसण्याची व उत्तम लावणी साधण्यासाठी आटापिटा करण्याची पण गरज नाही.
एस. आर. टी. तंत्राचे फायदे
नांगरणी, चिखलणी व लावणी न करायला लागल्यामुळे ५० ते ६० टक्के खर्च कमी होतो.आवणी / लावणीचे हे कष्ट वाचल्यामुळे ५० टक्के त्रास कमी होतो. चिखलणी करताना वाहून जाणाऱ्या सुपीक मातीची धूप (२०%) वाचेल व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येईल. एस. आर. टी. गादीवाफ्यावरील रोपांची पाने जास्त रुंद व सरळ सूर्यप्रकाशाकडे झेपावलेली दिसतात त्यामुळे जास्त जैविकभार (Biomass) म्हणजेच जास्त उत्पन्न मिळते.
वाढीव उत्पन्नाच्या समानतेची / समपातळीची सीमा गाठण्याची क्षमता या तंत्रामध्ये आहे. उदा. अगदी नवख्या शेतकऱ्यापासून, सगुणा बागेसारखे ते विद्यापीठ, या सर्वांचे समान वाढीव उत्पन्न आलेले आढळले. एस. आर. टी. मध्ये कोळपणी करण्याची गरज नाही. त्यामुळे अत्यंत कष्टाचे काम व पुन्हा वरच्या थरातील माती सैल करण्याची (धूप होण्याशी संबंधित) गोष्ट टळू शकते. रासायनिक खताच्या गरजेचे प्रमाण निम्म्यावर येऊ शकते.
एस. आर. टी. गादीवाफ्यांवर पावसाळ्यातील भातामध्ये सुद्धा शेतात नैसर्गिक गांडूळांची संख्या मोठ्या प्रमाणवर आढळते याचा अर्थ रोपांच्या बुडाशीच गांडूळखत बनण्याचे कारखाने आपोआप चालू रहातात. लावणीमुळे रोपांना होणारी इजा व “ट्रॉमॅटीक शॉक" टळू शकल्यामुळे रोग व किडींचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. तसेच जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्यामुळे वनस्पती स्वताच्या शरीरात जास्त साखर तयार करतात त्यामुळे रोग व किडी मुख्य पिकापासून पळून जातात. वरील कारणाप्रमाणे वनस्पतींनी त्यांच्या शरीरात जास्त साखर तयार केल्यामुळे एस. आर.टी मधील उत्पादने निश्चितच जास्त मधुर व रुचकर लागतात.
एसआरटी शेती लागवड पद्धत :
या प्रकारात आपण शेताची मशागत व गादीवाफे एकदाच करणार आहोत. या कायमस्वरूपी गादीवाफ्यांवर एका मागून एक अशी फेरपालट पिके घेणार आहोत. अशा पद्धतीत मिळणाऱ्या फायद्यांचा तुम्ही पुनःपुन्हा अभ्यास करा व काही बदलांचा प्रयोग पण करा. मात्र एकदाच करावयाचे हे गादीवाफे मन लावून अगदी छान करायला पाहिजेत. असे वाफे करण्याची उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर मध्ये भात कापणी झाल्या बरोबर जमिनीतील असलेल्या ओलाव्याचा फायदा घेऊन किंवा पाणी देऊन करावे.
किंवा मे-जून महिन्यात पहिला पाऊस/पाणी देऊन सुद्धा करता येतात. जमीन दोन वेळा उभी आडवी नांगरून घ्यावी. शेणखत किंवा तत्सम खत असल्यास ते शेतात पसरवून पॉवर टिलरने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. १३४ सें. मी. म्हणजेच साडेचार फुटावर लाईन दोरी व चुना किंवा राखेने ओळी आखून घ्याव्यात. तुम्हाला माहित असलेल्या पद्धतीने ओळींवरती पाट करून गादीवाफे तयार करावेत. गरजेप्रमाणे ते फावड्याने सारखे करून घ्यावेत. अशा प्रकारे तयार होणाऱ्या गादिवाफ्याचा माथा १०० सें.मी. आहे हे पहावे.
महत्वाची तत्वे :
या पद्धतीमध्ये पिकाच्या मुळाचा भाग जमिनीतच राहणे महत्त्वाचे असते. प्रत्येकवेळी पिक कापून घेऊन त्याची मुळे जमिनीमध्येच हळूहळू कुजण्यासाठी राहू द्यावीत त्यासाठी वरील प्रमाणे तणनाशक फवारावे. एकदा गादीवाफे तयार केल्यानंतर ते परत पुढील २० वर्षे नांगरायचे नाहीत. असे केल्यास प्रत्यक्ष होणारा खर्च वाचून निव्वळ नफ्यात वाढ होते व महत्वाचे म्हणजे आपली जमीन जास्त सुपीक व मऊ होत जाते. या पद्धतीमध्ये पिक ८ - १० दिवस लवकर तयार होते त्यामुळे जमिनीचा मगदूर तसेच भाताची जात व पावसाचे शेवटचे दिवस यांचा विचार करून भात कापणी पावसात सापडणार नाही हे पहावे.