Join us

गहू, हरभरा पिकांना पर्याय, अकोला जिल्ह्यात दोन एकरांत बहरली सोफ शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 1:45 PM

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सोफ शेतीचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात येत आहे.

अकोला : एकीकडे शेतकरी नवनवीन पिकांचा समावेश आपल्या शेतीत करू लागले आहेत. ज्याद्वारे कमी खर्चात अधिकच्या उत्पन्न  शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा या दोन पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून इतर पिकांकडे वळत आहेत. यंदा हिवरखेड परिसरात शेतकऱ्याने दोन एकरात सोफ पिकाची लागवड केल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात हिवरखेड मंडळातील हिंगणी शेतशिवारात शेतकरी देवानंद कलंत्री यांनी शेतामध्ये सोफ पिकाची लागवड केली आहे. सद्य:स्थितीत पीक चांगले बहरले असून, त्यांचा हा प्रयोग यशाकडे वाटचाल करीत आहे. प्रथमच वेगळ्या पिकाची लागवड करण्यात आल्याने तेल्हारा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या शेताची पाहणी केली. या पिकाची लागवड साधारणतः गुजरातसह विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते. अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हारा तालुक्यामध्ये हा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे. या पिकासाठी शेतकऱ्याला ८० हजार रुपये खर्च लागला आहे. आता उत्पन्न किती होईल, याकडे लक्ष लागले आहे.

ड्रोनद्वारे फवारणी

दरम्यान या शेतकाऱ्याने दोन एकरमध्ये सोफ शेतीचा प्रयोग केल्यानंतर फवारणीसाठी काय पर्याय वापरावा, या विवंचनेत असताना त्यांनी प्रथमच ड्रोनद्वारे फवारणी करण्याचे धाडस दाखवले. आता सोफ पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येत आहे. ड्रोन फवारणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला विविध कीटकनाशकांचा उपयोग करावा लागतो. त्याचबरोबर इतर तंत्रज्ञान काय वापरता येईल यासाठी यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना माहिती देऊन विविध तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

...तर सोप लागवडीत होणार वाढ 

प्रथमच पिकाची लागवड केल्याने उत्पन्न किती येईल, याचा अंदाज नाही. शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळाल्यास खरिपासह रब्बी हंगामामध्ये सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतामध्ये सोफ पीक लागवडीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी देवानंद कलंत्री म्हणाले की, यावर्षी माझ्या शेतामध्ये दोन एकर क्षेत्रात सोप पिकाची लागवड केली. या पिकाला आतापर्यंत ८० हजार रुपये खर्च लागला आहे. उत्पन्न किती निघेल, हे सांगता येत नाही. उत्पन्नात वाढ झाल्यास पुढे या पिकाची लागवड करू असेही ते म्हणाले. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीअकोलाशेतकरीनागपूरशेती क्षेत्र