Fruit Fly Management : फळमाशी (Fruit Fly) ही बहुभक्षी प्रकारची कीड असून १०० पेक्षा अधिक पिकांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
यात आंबा, पेरू, पपई, मोसंबी, चिकू, त्याचबरोबर काकडी, टरबूज, खरबूज, भोपळा वर्गीय पिके, तोंडली, पडवळ, दोडका, दुधी भोपळा याचबरोबर अनेक पिकांवर ही माशी दिसून येते.
या माशीचा एकात्मिक नियंत्रणासाठी काय उपाययोजना करता येतील, ते पाहूयात.
- फळे पक्व होण्याआधी काढावीत. पक्व झालेली फळे गळून बागेत पडतात. त्यामुळे फळमाशीची उत्पत्ती वाढते. हे टाळण्यासाठी खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
- फळमाशीची कोषावस्था जमिनीत असते. मातीत ती २-३ सें.मी. खोलीपर्यंत आढळते. त्यामुळे फळबागेतील माती वेळोवेळी हलवून घ्यावी. जेणेकरून कोष उघडे पडून सूर्यकिरणे व पक्षांद्वारे त्यांचे नियंत्रण होते.
- तुळशीमधील मिथाईल युजेनॉल या रसायनाकडे फळमाशी आकर्षित होते. त्यामुळे बागेच्या मध्ये तसेच कडेला तुळशीची झाडे लावावी.
- फळमाशीच्या तोंडाच्या अवयवांची रचना अशी असते, की ज्यामुळे तिला केवळ द्रवरूप स्वरुपातील पदार्थच खाता येतात. त्यामुळे फळमाशीच्या नियंत्रणासाठी विषारी अमीषाचा उपयोग करावा.
- विषारी आमिष तयार करताना गुळपाणी १ लिटर अधिक मिथाईल युजेनॉल ५ मि.लि. या प्रमाणात द्रावण तयार करून त्याचा वापर करावा. विषारी अमिषाकडे फळमाश्या आकर्षित होऊन त्यांचा नायनाट होतो.आमिषाचा उपयोग बागेच्या कडेने तसेच झाडांवर अशा पद्धतीने एकरी २० या प्रमाणात करावा.
- विशेषत: नर माश्यांच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉल चार ते पाच थेंब (५ मि.लि.) कापसाच्या बोळ्यावर टाकून प्लास्टिकच्या डब्यात ठेवावेत.
- प्रतिहेक्टरी असे ४ सापळे लावावेत. नर फळमाश्या या सापळ्याकडे आकर्षित होऊन त्यात पडून मरतात. दर १५ ते २० दिवसांनी रसायने बदलून मेलेल्या माश्या सापळ्यातून काढून टाकाव्यात. सापळा ४-५ फूट उंचीवर टांगावा.
- बहार धरण्यापूर्वी तसेच फळे लिंबाच्या आकाराची झाल्यावर हेक्टरी ४-५ रक्षक सापळे लावावेत. सापळे लावल्यामुळे बागेतील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. मादी माशीला मिलनासाठी नरांची उपलब्धता कमी होते. परिणामी मादी नराच्या शोधात अन्य ठिकाणी जातात किंवा अंडी फलीत न होण्याचे प्रमाण वाढते.
सौजन्य : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव जि. नाशिक