नंदुरबार : सातपुड्याच्या दरी खोऱ्यात चारा (Fodder) मुबलक असला तरीही काहीवेळा हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. यातून पाळीव दुधाळ जनावरांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होतो. यावर मात करण्यासाठी दुर्गम भागातील महिलांकडून हायड्रोफोनिक पद्धतीने चारा निर्मितीचे (hydroponic Fodder) तंत्र अवलंबले गेले आहे. कात्री ता. धडगाव येथील महिलेने हा प्रयोग यशस्वी केला असून त्यांचा कित्ता इतरही महिला गिरवत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) कात्री येथील महिला मोतीबाई रामा वळवी यांनी सर्वप्रथम त्यांच्या १० पाळीव शेळ्यांसाठी हा उपक्रम हाती घेतला होता. यात त्यांनी शेळ्यांना दररोज पोषक असा हिरवा चारा मिळावा यासाठी घरीच मका बियाण्याची लागवड केली होती. हायड्रोफोनिक पद्धतीने त्यांनी ही लागवड केली होती. यामुळे ८० टक्के चारा निर्मिती होत असून त्यांच्या शेळ्यांना दररोज हिरवेगार अन्न मिळत आहे.
हा चारा १०० टक्के सेंद्रिय....
हायड्रोफोनिक पद्धतीने चारा तयार करताना, मोतीबाई यांनी घरी मकाच्या दाण्यांना २४ तास भिजत घातले होते. २४ तासांनंतर हे दाणे गोणपाटात काढून घेत त्यांना मोड आणली होती. यानंतर मोड आलेले मक्याचे दाणे घरात सात ते आठ मातीच्या मोठ्या टोपल्या आणि प्लास्टिक ट्रे यात माती टाकून पेरून दिले होते. एका ठिकाणी ४०० ग्रॅम मका पेरून त्याला दररोज दर दोन तासाने पाणी दिले होते. यातून एका आठवड्यात हा चारा वाढून पुढे १२ दिवसांत त्याची संपूर्ण वाढ झाली आहे. एका ट्रेमध्ये साधारण सहा किलो चारा सध्या तयार होत आहे.
शेळ्यांना पोषक चारा
या चाऱ्यामध्ये पौष्टिक प्रथिने कार्बोदके चवदार जीवनसत्त्व सूक्ष्म अन्नघटकांचे प्रमाण भरपूर आहे. कमी पाणी लागत असल्यामुळे हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे कमी जागेत कमी खर्चात सगळ्या प्रकारच्या हवामानात वर्षभर चारा उत्पादक करणे शक्य आहे. चारा तयार करण्यासाठी कोणतेही रसायनिक खत किंवा औषध वापरले जात नसल्याने हा चारा १०० टक्के सेंद्रिय आहे. हा चारा शेळ्या आवडीने खात असून यामुळे शेळीचे आरोग्य चांगले राहत आहे.