यवतमाळ : तुरीचे पीक केवळ पावसाळ्यातच घेतले जाते. इतरवेळी त्याला शेंगा लागत नाहीत. यामुळे पावसाळ्यात आंतरपीक किंवा प्रमुख पीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले जाते. अधिक पाऊस आला तर तूर जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. याचाच फटका तूर उत्पादनाला दरवर्षी बसतो. यावर मात करणारा यशस्वी प्रयोग दारव्हा तालुक्यातील चाणी गावात झाला आहे. यामुळे रब्बीत पेरणी झालेली तूर मार्चमध्ये परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. या पिकाच्या पाहणीसाठी कृषी विभागासह विविध प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतशिवाराकडे धाव घेतली आहे. केवळ दोन फुटाच्या उंचीवर झाडाला शेंगा लागल्या आहे.
तुरीचे झाड म्हटले तर पाच ते सहा फुटापर्यंत त्याची उंची गाठली जाते. याशिवाय अधिक पाणी पेरणी केलेल्या तुरीला बाधक होते. याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसतो. त्याला बाजारात चांगले दर असले तरी त्याचे उत्पादन येत नाही. यामुळे तुरीचे पीक दरवर्षी शेतकऱ्यांना मृगजळ ठरते. मात्र, दारव्हा तालुक्यातील चाणीचे शेतकरी विजय हिंगासपुरे यांनी आपल्या शेतशिवारात केला. दोन एकर क्षेत्रांवर त्यांनी रब्बी तुरीची लागवड केली. ही तूर शेतकऱ्यांनी संशोधित केली आहे. पावसाळ्यात तुरीची टोबनी केली जाते. बहुतांश तूर आंतरपीक म्हणून लावली जाते. हिंगासपुरे यांनी पेरणी पद्धतीने तुरीची पेरणी केली. एकरी २५ किलो तूर त्यांनी शेतशिवारात पेरली.
तुरीच्या दोन ओळीत दीड फूट अंतर ठेवले. ऑक्टोबर महिन्यात पेरणी करण्यात आलेली ही तूर मार्च महिन्यात परिपक्व अवस्थेत तयार झाली आहे. एका झाडाला २५ ते ३० शेंगा लागल्या आहेत. पेरणी पद्धतीने तूर असल्याने यात झाडांची संख्या अधिक आहे. गुच्छा पद्धतीने तुरीच्या शेंड्यावर शेंगा लागल्या आहेत. याची उंची दोन फुटापर्यंतच आहे. यामुळे हा नवा प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात गर्दी होत आहे. या तुरीला त्यांनी तीन वेळा खत आणि पाण्याच्या पाळ्या दिल्या आहे. याशिवाय फूल सिसल्यानंतर त्याला त्यांनी तडन दिली आहे. यामुळे पावसाळ्यात तुरीचे उतपादन घटल्यास रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता येणार आहे. यामुळे डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना नव्या संशोधनाचा लाभ होणार आहे.
कर्नाटकची तूर यवतमाळात
रब्बी तुरीचे हे संशोधित वाण मूळचे कर्नाटकमधील आहे. काही शेतकऱ्यांनी हे वाण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये असलेल्या पिंप्री या गावात लावले. त्या ठिकाणी त्यांनी यशस्वी प्रयोग केला. मंगरुळपीरचे वाण आता चाणी गावात आले. या ठिकाणी त्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे. याठिकाणी तूर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे.