Tomato Crop Management : महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत टोमॅटोची (Tomato Farming) लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात टोमॅटोशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आवश्यक आहे. रब्बी हंगामातील (Rabbi Season) टोमॅटो लागवडीसाठी रोपवाटिका तयार करणे आवश्यक असते, हे तयार करताना काय काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर समजून घेऊया....
रब्बी टोमॅटो रोपवाटिका व्यवस्थापन कसे कराल? जाणून घ्या सविस्तर
- रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पुनर्लागवड केली जाते.
- साधारणपणे सरळ वाणांसाठी १६० ग्रॅम व संकरित वाणांसाठी ५० ग्रॅम बियाणे प्रति एकरसाठी पुरेसे होते.
- थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे चोळावे. त्यानंतर अँझोटोबॅक्टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे.
- साधारणपणे १ एकर क्षेत्रावर लागवडीसाठी १.२ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते.
- रोपवाटिकेची जमीन उभी-आडवी चांगली नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
- त्यानंतर ३ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
- गादीवाफ्यांमध्ये ५ किलो चांगले कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५.१५ आणि २०० ग्रॅम निंबोळी पेंड चांगली मिसळावी.
- सोबत ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम एकसारखे मिसळून घ्यावे जेणेकरून रोपवाटिकेमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळला जाईल.
- गादीवाफ्यावर हाताने किंवा खुरप्याच्या साह्याने १० सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर बी पेरावे.
- लगेच बी मातीने झाकून झारीने हलके पाणी द्यावे. साधारण ५ ते ८ दिवसांत बी उगवते.
- बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे नंतर जमिनीच्या मगदुरानुसार पाटाने पाणी द्यावे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
- रोपे, उगवल्यानंतर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ कापड २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणी प्रमाणे गादीवाफ्यावर लावून रोपे झाकून घ्यावीत.
- रोपे २५ ते ३० दिवसांत पुनर्लागवडीसाठी तयार होतात.
- विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरी