अजय पाटील
जळगाव : राज्यभरात केळी व कापसासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आता नावीन्यपूर्ण शेतीकडे वळू लागला आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता केवळ कापूस, केळी, उडीद, मूग, सोयाबीन ही पारंपरिक पिके घेत नाहीत. तर, मसाला पिकांसह, फळबाग लागवड व रेशीम शेती देखील करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असून, अनेक युवक आता शेती व्यवसायात उतरू लागले आहेत.
जळगाव जिल्ह्याचे एकूण क्षेत्र 8 लाख 50 हजार हेक्टर इतके आहे. त्यात खरीप हंगामात 7 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड होते. तर, रब्बी हंगामात 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रापर्यंतचे लागवड क्षेत्र आहे. अनेक भागांमध्ये पाणी नसल्याने रब्बीला कमी क्षेत्रावर लागवड होत असते. अशा परिस्थितीत पाणी, कृषी योजना, अनुदान याचा वापर करून अनेक योग शेतीमध्ये उतरत आहेत. त्यात नाविन्यपूर्ण बदल करून पारंपारिक पिकांसोबत इतरही पिकांची लागवड करत आहेत.
तेलबियांचे क्षेत्र 45 हजार हेक्टरपर्यंत वाढले...
तेलबियांचे क्षेत्र जिल्ह्यात वाढू लागले आहे. आतापर्यंत भुईमूग व सोयाबीन ही पिके घेतली जात होती. मात्र, आता तीळ य सूर्यफूल या दोन्ही तेलबियांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्ह्यात तेलबियांचे क्षेत्र वाढत असून, एकूण 50 हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड होत आहे. विशेषकरून सूर्यफुलाचे क्षेत्र यंदाच्या रब्बी हंगामात पहिल्यांदाच हजार हेक्टरच्या वर गेले आहे. गेल्यावर्षी सूर्यफुलाची केवळ 64 हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा मात्र, जिल्ह्यात एकूण 4 हजार हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड होण्याचा अंदाज आहे. तर तिळाची 200 हेक्टरवर लागवड होऊ शकते, तेलबियांच्या क्षेत्रात रब्बी हंगामात जिल्ह्यात 311 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आधुनिकतेसह नावीन्यपूर्ण शेतीवर भर
जिल्ह्यात आसोदा, भादली, शेळगाव या भागात मसाला पिकामधील ओव्याची शेती केली जात आहे. अनेक युवक वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.जळगाव जिल्ह्यात 5 वर्षापूर्वी केवळ 30 ते 40 एकरवर रेशीम जात होती. ती आज 500 एकरपर्यंत वाढली आहे. ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र 50 हेक्टरवर गेले आहे. नावीण्यपूर्ण प्रयोगासह आधुनिकतेची कास शेतकरी धरत असून, शेती वाढली आहे.
शासनाकडूनही प्रोत्साहन..
कृषी क्षेत्रात होत असलेल्या या बदलासाठी शासनाकडूनही विविध योजनांच्या माध्यमातून नवीन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. रेशीम, फळबाग लागवड, यांत्रिक शेतीसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यातून शेतकऱ्यांना 40 ते 50 टक्क्यांपर्यंतचे अनुदान मिळून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. यंदा फळ लागवडीचे क्षेत्र पोहोचले 75 हजार पर्यंत पोहचले आहे. केळी पिकाची 55 हजार 454 हेक्टर व लागवड करण्यात आले आहे. तर लिंबू पाच हजार नऊशे हेक्टर, पपई 3700 हेक्टर, पेरू 1300 हेक्टर, डाळिंब सातशे हेक्टर, मोसंबी 3114 हेक्टर, टरबूज 700 हेक्टर, ड्रॅगन फ्रूट 50 हेक्टर, चिकू 50 हेक्टर अशा पद्धतीची लागवड यंदा करण्यात आली आहे.