Join us

सातपुड्यातील आदिवासी शेतकरी जोपासताय 'चारोळी', चारोळी पिकाचं गणित काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 8:45 PM

सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आमसूल, स्ट्रॉबेरी, भगर सारखी पिके घेत चारोळीसारखे पीकही घेऊ लागले आहेत.

रमाकांत पाटील

नंदुरबार : पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत आता शेतकरी अधिक उत्पन्न देणारी पिके घेऊ लागली आहेत. त्यातच नंदुरबार सारख्या जिल्ह्यातील शेतकरी देखील यात मागे राहिलेले नाहीत. सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आमसूल, स्ट्रॉबेरी, भगर सारखी पिके घेत चारोळीसारखे पीकही घेऊ लागले आहेत. येथील स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना एका झाडापासून जवळपास २५ ते ४० किलो चारोळीचे उत्पादन मिळत आहे. यावर्षी या भागातील चारोळी सुरत, इंदूर, रायपूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून भावदेखील चांगला मिळत आहे. 

सातपुड्यात सुमारे ३० हजारापेक्षा अधिक पारंपरिक चारोळीचे वृक्ष आहेत. त्याचे संगोपन त्या भागातील आदिवासींनी केल्याने त्यापासून दरवर्षी त्यांना उत्पन्न मिळते. यापूर्वी या झाडांवरून चारोळीचे फळ काढल्यानंतर ते स्थानिक पातळीवर त्यावर प्रक्रिया करीत होते. त्यासाठी त्यांना अधिक कष्टही करावे लागत होते. शिवाय घरगुती जात्यावरच ते काढून बाजारात विक्रीसाठी आणत असल्याने चारोळी कमी आणि त्याचा भुगाच जास्त होत होता. त्यामुळे एका झाडावरून जेमतेम चार-पाच किलो चारोळीचे उत्पन्न येत होते. त्याचाही दर्जा चांगला नसल्याने स्थानिक व्यापारी मागतील त्या दराने ते चारोळी विक्री करीत होते. त्यामुळे चारोळीचे उत्पन्न नगण्य होते. 

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कृषी विभाग व विविध संस्थांतर्फे आदिवासींना प्रशिक्षण देऊन तसेच चारोळी काढण्याचे मशीन पुरवल्याने आता चारोळीचा दर्जा सुधारला आहे. तसेच वाया जाणारे उत्पादन घटल्याने एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे. सातपुड्यातील विशेषत: धडगाव तालुक्यात चोंदवाडा बुद्रुक, खरवड, मांडवी, मुंगबारी, धनाजे, मनखेडी, शिरसाणी, गेंदामाळ, बिजरी, नंदवाळ, आदी गावांमध्ये चारोळीची अधिक झाडे असून, या परिसरात चारोळी काढण्याचे दोन मशीन बचत गटांना देण्यात आले आहेत. हे मशीन ताशी ४० ते ५० किलो चारोळी काढतात. तसेच चारोळीचे टरफलेही वीटभट्टी व कौल भाजण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे त्यालाही तीन ते चार रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. या परिसरात यंदाच्या हंगामात ३० क्विंटलपेक्षा अधिक चारोळीचे उत्पादन झाले आहे.

चारोळी काय आहे? 

चारोळी हे एक प्रकारचे बी आहे. हा एक सुकामेवा असून याचा वापर मुख्यत: दुधाच्या मिठाईत व शक्तिवर्धक अन्नऔषधीत करतात. हे बी चार नावाच्या वनस्पती पासून मिळवले जाते. चारोळीचा वापर मुख्यत्वे बासुंदी, आईस्क्रीम, पेढे, बर्फी, श्रीखंड, खीर व इतर मिठाईच्या पदार्थांत करतात. काजू, बदाम, खारीक, गोडंबी, चारोळी, खडीसाखर यांचे मिश्रण करून पौष्टिक सुकामेवा तयार केला जातो. झाडाच्या सालीपासून डिंक व टॅनिन मिळते. चारोळीच्या पानांपासून गुरांना चारा उपलब्ध होतो. चारोळीच्या 'बी'पासून तेल निर्मितीची प्रक्रिया केली जाते.  

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीनंदुरबारशेतकरी