Tur Khodva : तूर हे पीक खरीप हंगामात (Kharif Season) घेतले जात असले तरी उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातही पीक जोमात वाढते आणि जमिनीत ओलावा असल्याने फुलोरा येणे चालूच राहते. त्यामुळे शेतकरी तुरीचा खोडवा (Tur Khodva) ठेवण्याचा विचार करतात. त्यानुसार खोडवा ठेवताना नेमकी काय काळजी घ्यावी. हे आजच्या भागातून समजून घेऊया....
- आयसीपीएल ८७, आयसीपीएल ८८०, आयसीपीएल ३९ व आयसीपीएल १५१ या जातींचा खोडवा ठेवावा. कारण या जाती कमी कालावधीच्या आहेत.
- विपुला, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५१ किंवा बीडीएन ७०८ व बीडीएन २०१३-४१ (गोदावरी) या जास्त कालावधींच्या असल्याने या जातींचा खोडवा ठेवू नये.
- रब्बी हंगामात २-३ पाणी देणे शक्य असल्यासच तुरीचा खोडवा ठेवावा.
- पक्व झालेल्या शेंगा तोडून गुच्छाच्या खाली १०-१५ सें.मी. अंतर ठेवून झाडाची फांदी कापून टाकावी.
- हलकी वखरणी करून एकरी एक गोणी डीएपी खत देऊन पाणी द्यावे.
- पहिल्या पिकाच्या शेंगा तोडल्यानंतर खोडवा ठेवताना दिलेल्या पाण्यानंतर दुसरे पाणी २० दिवसांनी पुन्हा फुटवे येते वेळी आणि तिसरे पाणी त्यानंतर २० दिवसांनी शेंगा भरताना द्यावे.
- खोडवा पिकात ३-४ आठवड्यात एक खुरपणी व नंतर एक ते दोन कोळपण्या द्याव्यात.
- फुलकळी लागताना व फुलोरा जोमात असताना (दोन वेळा) १ टक्का पोटॅशियम नायट्रेट किंवा २ टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी केल्याने दाण्याचे वजन वाढते, प्रतही चांगली मिळते.
- शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) च्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फुलकळी येताना ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- ५० टक्के फुलोरा आल्यानंतर एचएनपीव्ही ५०० एलई (हेलीओकील) १० मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.
- शेंगा भरण्याच्या अवस्थेत बेंझोएट, ५ टक्के एसजी, ३ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ