Join us

Garlic Farming : लसूण शेतीसाठी खत आणि पाणी व्यवस्थापनाचे तंत्र समजून घ्या, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:35 IST

Garlic Farming : थंडी पडायच्या अगोदर उगवण होऊन पात वाढीला लागली पाहिजे. थंड हवामान गड्डीच्या वाढीला पोषक असते.

Garlic Farming :  महाराष्ट्रात लसणाची लागवड (Garlic Cultivation) रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच आक्टोबर-नोव्हेंबर या काळात करतात. थंडी पडायच्या अगोदर उगवण होऊन पात वाढीला लागली पाहिजे. फार आधी लागवड केल्यास नुसती पात वाढते व गड्डा पोसत नाही. थंड हवामान गड्याच्या वाढीला पोषक असते. या पिकासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन (Lasun Lagvad) कसे करावे, हे जाणून घेऊयात... 

लागवडीचे अंतर आणि बियाण्याचे प्रमाण लसणाची लागवड शक्यतो सपाट वाफ्यातून करतात. जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करावेत, दोन ओळीतील अंतर १५ सें.मी. व दोन कुडयातील अंतर १० सें.मी. ठेवावे. लसणाची लागवड कुडया किंवा पाकळया टोकून करतात. लागवडीची खोली २-३ सें.मी. ठेवावी. कोरड्या जमिनीत लागवड करून लगेच पाणी द्यावे. लसणाचे हेक्टरी ६ क्विटल बियाणे लागते. कॅप्टन किंवा काबेन्डॅझिम २.५ ग्रॅम प्रती किलो कुडया किंवा पाकळया या प्रमाणात पेरणीपुर्वी चोळावे त्यामुळे मर न होता पिकाची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

खत व्यवस्थापनलागवडीसाठी जमीन तयार करताना दर हेक्टरी ४० ते ५० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. तसेच हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लसुण लागवडी पूर्वी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्राची मात्रा द्यावी.

पाणी व्यवस्थापनलसणाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे तसेच लसणाचे गड्ढे जमिनीत वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी देणे किंवा पाण्याचा ताण देणे टाळावे, लागवडीनंतर पिकाला लगेच पाणी देणे गरजेचे असते, त्यामुळे उगवण चांगली होते. दुसरे पाणी त्यानंतर ३-४ दिवसांनी दयावे. पुढच्या पाण्याच्या पाळया नियमित ८ ते १० दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे दयाव्यात. लसणाचे गड्ढे वाढत असतांना पाण्याचा ताण पडू देऊ नये. काही ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.

 - डॉ. राकेश सोनवणे, डॉ. रवींद्र पाटील, कांदा, द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन