Unhali Pike : उन्हाळी हंगामातील जास्तीच्या तापमानामुळे (Temperature) किंवा पाण्याचा इतरत्र वापर केला गेल्यामुळे पिकांसाठी पाण्याची उपलब्धता कमी होते. अशा परिस्थितीत उन्हाळी पिकांचे (Unhali Pike) विशेष व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
आच्छादनाचा वापर करणे : उन्हाळी हंगामात (Summer Season) जास्तीच्या तापमानामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवन होऊन वाया जाणारे पाणी आच्छादनाचा वापर करून थोपवता येते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे आच्छादन हेक्टरी ५ टन या प्रमाणात पीक ३ ते ४ आठवड्यांचे असताना शेतात टाकावे.
एका आड एक सरी भिजविणे : पाण्याची उपलब्धता अत्यल्प असल्यास उन्हाळी पिकांची एका आड एक सरी भिजवावी. दुसऱ्या पाण्याच्या वेळी पहिल्यांदा जी सरी भिजवली नसेल ती भिजवावी. असे केल्याने पाण्यात ३० ते ४० टक्के बचत होते तसेच आपले पीकही वाचवता येते.
पानांची संख्या कमी करणे : उन्हाळी हंगामातील उष्ण वातावरणामुळे तापमान नियंत्रित करण्यासाठी पानांद्वारे बाष्पनिष्कासन मोठ्या प्रमाणात होते. मात्र बहुतेक ठिकाणी उन्हाळी हंगामात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे पिकास पाण्याची उपलब्धता कमी असते. अशावेळी पिकाच्या शेंड्याकडील नवीन पाने पिकावर ठेवून खालच्या बाजूची जुनी पाने काढून टाकावीत.
केवोलींचा फवारा करणे : पानांद्वारे होणारे बाष्पनिष्कासन कमी करण्यासाठी केओलीनचे (चुन्याची भुकटी) द्रावण ८ टक्के (१० लिटर पाण्यात ८०० ग्रॅम) या प्रमाणात पिकाच्या पानांवर फवारावे.
पिकाभोवती आडोसा करणे : उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यामुळे पीक कोमेजून जाते. पर्यायाने उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी पिकाच्या कडेने, वाऱ्याच्या दिशेने शेवरी, धैच्या यासारखी पिके २ ते ३ ओळीत लावल्याने पिकास चांगला आडोसा तयार होतो.
पिकास सायंकाळी पाणी द्यावे : वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे सकाळी किंवा दुपारी पिकास पाणी दिल्यास पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. हे टाळण्यासाठी पिकास शक्यतो सायंकाळी पाणी द्यावे.
पाटाची निगराणी करणे : चारीतून वाहणाऱ्या पाण्यात तणांमुळे अडथळा निर्माण होतो तसेच चारीत पडलेल्या भेगा व उंदरांच्या बिळामुळे पाण्याचा अपव्यय होतो. ठराविक कालावधीनंतर चारीची स्वच्छता करावी. भेगा व बिळे बुजवावीत.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त शास्रज्ञ, कृषी विद्यापीठ