फळे, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य व नगदी पिकांच्या उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. खतांची वाढती गरज व किमती तसेच रासायनिक खतांची जमिनीतील अकार्यक्षमता यांमुळे पीक उत्पादन वाढीच्या खर्चात वाढ होत आहे.
पिकांसाठी उपयुक्त जीवाणू खते
बातावरणातील मुबलक नैसर्गिक नत्र वायूचे शोषण करून पिकांसाठी उपयोगात आणणाऱ्या जीवाणूंचा नत्रयुक्त रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास मोठे योगदान राहणार आहे. स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास जीवाणूंचा वापर फायदेशीर ठरणार आहे. अशा जीवाणूंचा जमिनीत वापर वाढविल्यास उत्पादनवाढ व रासायनिक खतांचा मर्यादित वापर होणार आहे.
जमिनीतील अन्नद्रव्ये उपलब्धतेसाठी उपयुक्त जीवाणू
अँझोस्पिरीलम लिपोफेरम
अॅझोटोबॅक्टर कुकोकम
अॅसिटोबॅक्टर डायअॅझोट्रोपिकस
रायझोबियम जॅपोनिकम
रायझोबियम लेग्यूमिनोसॅरम
बॅसिलस मेगाटेरीयम
फ्रेंच्यूरिया ऑरेनशिया
अॅझोटोबॅक्टर
अझोटोबॅक्टर जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात. हवेमध्ये मुक्त नत्राचे प्रमाणः ७८ टक्के असून मुक्त स्वरूपातील नत्रवायू अॅझोटोबॅक्टर जीवाणूमार्फत जमिनीमध्ये शोषला जातो व जमिनीत स्थिर करून पिकास उपलब्ध करून दिला जातो. अॅझोटोबॅक्टर जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. अॅझोटोबॅक्टर जीवाणू खतांचा वापर द्विदल पिके वगळून इतर सर्व एकदल पिकांना उपयोगी आहे. उदाहरणार्थ, ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सूर्यफूल, भाजीपाला व फळपिके इत्यादी. अॅझोटोबॅक्टर जीवाणू खतांच्या वापरामुळे १० ते २५ टक्क्यांपर्यंत अधिक उत्पादन मिळते तसेच १० ते २५ किलो प्रति हेक्टरी नत्र खताची बचतही होते.
अझोटोबॅक्टर वापरण्याची पद्धत
बीजप्रक्रिया करण्यासाठी २५ मिली जीवाणू खत व १०० मिली गुळाचे द्रावणं प्रतिकिलो बियाण्यासाठी वापरावे. प्रक्रिया केलेले बियाणे स्वच्छ कापडावर पसरवावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे. रोपांसाठी जीवाणू खत वापरण्यासाठी रोपांची मुळे १०० मिली जीवाणू खत व १० ली. पाणी द्रावणात ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी. पिकांच्या शाखीय वाढीच्या अवस्थेपर्यंत जमिनीतून द्यावयाचे असल्यास सेंद्रिय . पदार्थाचे प्रमाण जास्त असावे. साधारणतः २ ली. जर्जीवाणू खत व २०० ली. पाणी असे प्रमाण घेऊन दहा दिवसांच्या अंतराने जमिनीतून द्यावे.
अॅझोस्पिरीलम
अॅझोस्पिरीलम जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात. अॅझोस्पिरीलम जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळांभोवती व मुळांमध्ये राहून सहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. हे जीवाणू अधिक कार्यक्षम असून ते अॅझोटोबॅक्टरपेक्षा दुप्पट प्रमाणात हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात. अॅझोस्पिरीलम जीवाणू एकदल, भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. अॅझोस्पिरीलम प्रतिवर्ष प्रतिहेक्टरी २० ते ४० किलो नत्राचे स्थिरीकरण करतात व पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ करतात.
अॅझोस्पिरीलम वापरण्याची पद्धत
१ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) द्रावण करून वापरावे. बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे. रोपांची पुनर्लागवड करण्याआधी पाणी (१० लीटर) व जीवाणू (१०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी. पिकांच्या शाखीय वाढीपर्यंत २०० ली. पाण्यात २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.
अॅसिटोबॅक्टर
अॅसिटोबॅक्टर जीवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात. अॅसिटोबॅक्टर जीवाणू आंतरप्रवाही असून मुळांद्वारे नत्र उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. हे जीवाणू साखर असलेल्या पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. अॅसिटोबॅक्टर ऊस, रताळे, गोड ज्वारी इ. पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती सह-सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात. या जीवाणू खतांमुळे ऊस पिकावर खूप चांगला परिणाम दिसून येतो. या जीवाणू खतांद्वारे ऊस पिकाला ४० ते ५० टक्के नत्राचा पुरवठा होऊन उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते. नत्र स्थिरीकरणाव्यतिरिक्त हे जीवाणू इंडॉल अॅसेटीक अॅसिड तयार करत असल्यामुळे पिकांच्या मुळांच्या वाढीसही मदत होते.
अॅसिटोबक्टर वापरण्याची पद्धत
गोड ज्वारी पिकासाठी १ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे. बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.रोपांसाठी पाणी (१० ली.) व जीवाणू (१०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी. ऊस व रताळे पिकांसाठी पाणी (४० ली.) व जीवाणू (२५० मिली) द्रावणात उसाच्या कांड्या बुडवून लागवड करावी. पिकांच्या शाखीय वाढीपर्यंत २०० ली. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.
रायझोबियम
रायझोबियम जीवाणू सहजीवी पद्धतीने वातावरणातील नत्र पिकांच्या मुळांवरील गाठींमध्ये स्थिर करतात. रायझोबियम जीवाणू पिकांना हवेत असलेले नत्र मुळांवरील गाठींमध्ये स्थिर करतात व त्या बदल्यात पिकांकडून खाद्य मिळवतात. रायझोबियम जीवाणू द्विदल पिकांसाठी उपयोगी आहे. रायझोबियम जीवाणूंच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. पिकांनुसार या प्रजातीची निवड करावी लागते.
रायझोबियम वापरण्याची पद्धत
१ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे. बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.
पिकांच्या शाखीय वाढीपर्यंत २०० ली. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.
स्फुरद विरघळविणारे जीवाणू
नत्रााबरोबर स्फुरद हेसुद्धा पिकांचे प्रमुख अन्नद्रव्य आहे. स्फुरदयुक्त रासायनिक खतांद्वारे पुरविलेल्या स्फुरदांपैकी बरेचसे स्फुरद जमिनीतील निरनिराळ्या रासायनिक प्रक्रियांमुळे स्थिर होऊन ते पाण्यात न विरघळणाऱ्या (घट्ट) स्वरूपात रूपांतर होते, असे स्फुरद वनस्पतींना उपयुक्त नसते. घट्ट स्वरूपातील स्फुरद विरघळून द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य स्फुरद विरघळविणारे जीवाणू करतात. पाण्यात विरघळणारे द्राव्य स्वरूपातील स्फुरदच पिकांची मुळे शोषण घेऊ शकतात. स्फुरद विरघळविणारे जीवाणू सर्वच पिकांमध्ये उपयोगी आहे. तसेच उपयुक्त असलेले वाढवर्धक द्रव्य तयार करण्याचे कार्य हे जीवाणू करतात.
स्फुरद विरघळविणारे जीवाणू वापरण्याची पद्धत
१ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे. बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.
रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी पाणी (१० ली.) व जीवाणू (१०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी. पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी २०० ली. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.
पालाश विरघळविणारे जीवाणू
नत्र, स्फुरदबरोबर पालाश हे अन्नद्रव्य पिकांसाठी प्रमुख अन्नद्रव्यांपैकी एक आहे. जमिनीमध्ये पालाश या अन्नद्रव्याची मुबलकता असूनही तो स्थिर म्हणजेच घट्ट स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही. हे जीवाणू स्थिर स्वरूपातील पालाश जैव रासायनिक क्रियांद्वारे पिकांना उपलब्ध करून देतात. पालाश या अन्नद्रव्यांचे वहन होत नाही, हे जीवाणू पालाशची वहनक्रिया सक्रिय करतात. पालाश विरघळविणारे जीवाणू सर्वच पिकांमध्ये उपयोगी आहे. पिकातील कीड व रोगप्रतिकार शक्ती तसेच प्रत सुधारण्यासाठी पालाश विरघळविणारे जीवाणू खूप फायदेशीर आहे.
पालाश विरघळविणारे जीवाणू वापरण्याची पद्धत
१ किलो बियाण्यासाठी जीवाणू (२५ मिली) व गूळ (१०० ग्रॅम) वापरावे. बियाणे स्वच्छ कापडावर किंवा कागदावर पसरावे व सावलीत वाळवून लगेच पेरावे.
रोपांची पुनर्लागवड करण्यासठी पाणी (१० ली.) व जीवाणू (१०० मिली) चे द्रावण करून रोपांची मुळे ३० मिनिटे बुडवून पुनर्लागवड करावी. पिकांच्या पक्वतेच्या अवस्थेत २०० ली. पाण्यातून २ ली. जीवाणूंचे द्रावण जमिनीतून द्यावे.
जीवाणू संवर्धन वाढविण्याची घरगुती पद्धत
२० ली. क्षमतेचा प्लास्टिक ड्रम घ्यावा. अर्ध्या ड्रममध्ये ताजे शेण, १ किलो गूळ व १ ली. जीवाणू खतांचे मातृवाण टाकावे. त्यानंतर ड्रम पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाणी टाकावे. ड्रममधील द्रावण काठीने रोज हलवावे. ड्रममध्ये हवा खेळती राहील अशा पद्धतीने गोणपाटाने झाकून सावलीत ठेवावा. सदरचे द्रावण १० दिवस अंबवावे व एकरी २ लीटर द्रावण २०० लीटर पाण्यातून जमिनीतून द्यावे किंवा पिकांवर फवारणी करावी. १ टन कुजलेल्या सेंद्रिय खतांमध्ये नत्र स्थिर करणारे, स्फुरद व पालाश विरघळविणारे प्रत्येकी २ ली. मिसळून लागवडीच्या वेळी वापरावे. या प्रकारे उपयुक्त जीवाणू खतांची वाढ करून शेतात नियमित वापर करावा. त्यामुळे त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहतो. पिकांमध्ये रासायनिक खतांच्या मर्यादित वापरामुळे जमीन सजीव राहते व उत्पादन खर्च कमी होतो.
महत्वाची सूचना : जीवाणू खतांसोबत कोणतेही रासायनिक बुरशी व कीटकनाशके एकत्रित मिसळू नये. जीवाणू खते वापरल्यानंतर ८ ते १० दिवस कोणतेही रासायनिक बुरशी व कीटकनाशके वापरू नये.
लेखक - डॉ. नितीन ठोके, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक