Wheat Crop Management :रब्बी हंगामातील (Rabbi Season) पेरण्याची लगबग सुरु आहे. यातील गहू पिकाच्या व्यवस्थापनासाठी विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते. या काळात वातावरणात नेहमीच बदल जाणवत असतो. अशावेळी रोग किडींचा प्रादुर्भाव (Gahu Kid Niyatran) होण्याची शक्यता असते. गहू पिकावरील करपा रोगासह किडींचे नियंत्रण कसे करावे, हे जाणून घेऊयात....
रोग नियंत्रण
- गहू पिकास काळा व नारंगी तांबेरा, करपा, गव्हाच्या दाण्यावरील काळे टोक या रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची संभावना असते.
- या रोगांपैकी काळा व नारंगी तांबेरा या दोन्ही महत्त्वाच्या हानीकारक रोगांमुळे ९० टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
- तांबेरा रोगापासून बचाव करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या तांबेरा प्रतिबंधक वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी.
- तांबेरा रोग नियंत्रणासाठी तांबेरा रोगाची लागण दिसून येताच मॅन्काझेब ७५ टक्के डब्ल्यु पी. ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून किंवा टेब्युकोनॅझोल 50% + ट्रायफ्लोक्झीस्ट्रोबीन 25% डब्ल्यु. जी. 10 ग्रॅम / 10 लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी.
- करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्सिक्लोराईड + मॅन्कोझेब या बुरशीनाशकाच्या प्रत्येकी २० ग्रॅम १० लिटर पाण्यातून दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात,
- किंवा क्रेसोक्झिम मिथील 44.3 टक्के एस.सी. या बुरशीनाशकाची १० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
शिफारस
गव्हाच्या खोडावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन करणे, अधिक धान्य उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी, रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच व त्यानंतर १५ दिवसांनी टेबुकोनॅझोल ५०% + टायफ्लोझिस्टोबिन २५% डब्लू जी या संयुक्त बुरशीनाशकाची ६ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारण करावी.
कीड संरक्षण
- गहू या पिकास मावा, खोडमाशी व खोडकिडा यांचेपासून नुकसान पोहोचते.
- मावा, खोडमाशी व खोडकिडा यांचे पेरणीनंतर तीन आठवड्यापर्यंत प्रादुर्भाव झाल्यास जास्त नुकसान होऊ शकते.
- मावा कीड दिसून येताच मेटारायझियम अॅनिसांप्ली ५० ग्रॅम किंवा बिव्हेरिया बेसियाना ५० ग्रॅम किंवा व्हरटीसिलीयम लेकॅनी ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
- मावा किडीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी थायामेथोझॅम २५ टक्के विद्राव्य दाणेदार १ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून गरजेप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने एक किंवा दोन फवारण्या करूयात.
- गहू साठवणुकीच्या काळात सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी उन्हात वाळविलेल्या बियाण्यास वेखंड भुकटी १० ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यात मिसळावे.
- डॉ. योगेश पाटील, डॉ. भानदुास गमे आणि प्रा. भालचंद्र म्हस्के
जिल्हा विस्तार केंद्र, कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक