Wheat Farming Management : वेळेवर पेरणी करावयाचा गव्हाचा पेरणीचा (Wheat Sowing) योग्य कालावधी म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा. पेरणी २२.५ सेंटीमीटर अंतरावर तसेच ६ सेंटीमीटर खोलीवर करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम कॅप्टन किंवा ३ ग्रॅम थायरम + प्रति १० किलो बियाणास प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझेटोबॅक्टर व पीएसबी याप्रमाणे बीजप्रक्रिया (Seed Treatment) करावी. गहू पिकास पेरताना प्रति एकर २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद आणि १६ किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर २१ दिवसांनी, पहिल्या पाण्याच्या वेळी पुन्हा प्रति एकर २४ किलो नत्राची मात्रा दयावी.
निरनिराळ्या खतांच्या माध्यमातून नत्र, स्फुरद आणि पालाशी प्रति एकर मात्रा पुढीलप्रमाणे द्यावी.
युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरियट ॲाफ पोटॅश ही खते देताना गहू पिकास प्रति एकर ५२ किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २७ किलो म्युरियट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी द्यावे आणि पेरणीनंतर २१ दिवसांनी ५२ किलो युरिया प्रति एकर द्यावा.
डीएपी, म्युरियट ॲाफ पोटॅश आणि युरिया ही खते देताना गव्हाच्या पिकास पेरणीच्या वेळी प्रति एकर ५२ किलो डीएपी, २७ किलो म्युरीयट ॲाफ पोटॅश आणि ३३ किलो युरिया द्यावा. पेरणीनंतर २१ दिवसांनी पुन्हा ५२ किलो युरिया द्यावा. २०ः२०ः२०, म्युरियट ऑफ पोटॅश आणि युरिया या खताच्या माध्यमातून गव्हाच्या पिकास पेरणीच्या वेळी १२० किलो २०ः२०ः२०, २७ किलो म्युरियट ॲाफ पोटॅश ही खते प्रति एकर द्यावीत आणि पेरणीनंतर २१ दिवसांनी प्रति एकर ५२ किलो युरिया द्यावा.
१५ः१५ः१५, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया ही खते द्यावयची झाल्यास पेरणीच्या वेळी प्रति एकर १०७ किलो १५ः१५ः१५, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १८ किलो युरिया द्यावा. पेरणीनंतर २१ दिवसांनी प्रति एकर ५२ किलो युरिया द्यावा.
१०ः२६ः२६, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया ही खते द्यावयची झाल्यास गव्हाच्या पिकास पेरणीच्या वेळी प्रति एकर ६२ किलो १०ः२६ः२६, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३९ किलो युरिया द्यावा. पेरणीनंतर २१ दिवसांनी ५२ किलो युरिया द्यावा.
१९ः१९ः१९, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया या खतामधून नत्रः स्फुरदः पालाशची शिफारस केलेली मात्रा देताना गव्हाच्या पिकास पेरणीच्या वेळी प्रति एकर ८४ किलो १९ः१९ः१९, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १८ किलो युरिया द्यावा आणि पेरणीनंतर २१ दिवसांनी प्रति एकर ५२ किलो युरिया पहिल्या पाण्याच्या अगोदर द्यावा.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ