Join us

Wheat Farming : पेरणीच्या वेळेनुसार गव्हाच्या कोणत्या जातींची निवड कराल? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 6:35 PM

Wheat Farming :रब्बी हंगामाला सुरवात झाली असून आता गव्हाच्या पेरणीला सुरवात होईल. पेरणीच्या वेळी कोणत्या जातीच्या गव्हाची निवड करावी, हे या लेखातून पाहुयात..

Wheat Farming : रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरवात झाली असून आता गव्हाच्या पेरणीला सुरवात होईल. पेरणीच्या वेळी कोणत्या जातीच्या गव्हाची निवड (Wheat Farming) करावी, हे या लेखातून पाहुयात..

गहू पिकाला Wheat Cultivation) थंड परंतु कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. पिकाच्या अनुकूल वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. मात्र दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्याचे वजन वाढते.

या पिकास आवश्यक असलेले तापमान पीक वाढीच्या योग्य अवस्थेत मिळण्यासाठी पेरणीची वेळ (Sowing Time) अतिशय महत्त्वाची ठरते. त्यानुसार बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करावी. बागायती गव्हाची पेरणी ५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्‍टरी अडीच क्विंटल घटते. 

जिराईत गव्हाच्या पेरणीसाठी         गहू पिकाच्या फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत योग्य तापमान आणि जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. त्यासाठी जिराईत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. उशिरापर्यंत पडणारा पाऊस लक्षात घेता जिराईत गव्हाची पेरणी एक/दोन आठवड्याने उशिरा करण्यास हरकत नाही. पेरणीच्या वेळेनुसार शिफारस केलेल्या जातींचा तसेच हेक्‍टरी बियाणांचा वापर करावा. जिराईत पेरणीसाठी NIDW-15 (पंचवटी) व शरद या जातींची शिफारस केलेली आहे. जिराईत पेरणीसाठी हेक्टरी ८० ते १०० किलो बियाणे वापरावे. 

बागायत वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी... 

तसेच बागायत वेळेवर पेरणीसाठी MACS-6222, NIAW-301 (त्र्यंबक), NIAW-917 (तपोवन) व NIAW-295 (गोदावरी) या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. बागायत वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. बागायत उशिरा पेरणीसाठी AKAW-4627 व NIAW-34 या जातींची शिफारस केलेली आहे.

उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी फुले समाधान या वाणाची शिफारस आहे. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास NIAW-1415 (नेत्रावती) व  HD-2187 (पुसा बहार) या वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे.

- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ 

टॅग्स :गहूशेती क्षेत्रशेतीपेरणीपीक व्यवस्थापन