Drone Spraying : पारंपारिक पद्धतींसाठी पूर्ण दिवसाच्या कामाच्या तुलनेत, एक सामान्य आधुनिक ड्रोन फक्त १० मिनिटांत एक हेक्टर फवारणी (Drone Favarani) करू शकतो. पिकांचे आरोग्य आणि उत्पादन सुधारणे, रसायनांचा अचूक आणि वेळेवर वापर करून, ड्रोन पिकांचे रोग रोखण्यास, तणांची वाढ कमी करण्यास मदत करू शकतात. तर ही ड्रोन फवारणी (Drone Spraying) काय काळजी घ्यावी? हे या लेखातून जाणून घेऊयात....
ड्रोनव्दारे फवारणीसाठी लागणारे पाणी व खतांची मात्रा
- ड्रोन हा नॅनोखताची / द्रव्यरुप रासायनिक खताची काटेकोर आणि लक्ष्यावर आधारीत फवारणी करते.
- एक एकर क्षेत्रफळाकरीता १० लीटर क्षमता असलेल्या ड्रोन ची निवड करावी.
- ड्रोनव्दारे ५ ते ७ मिनिटामध्ये एक एकर क्षेत्राची फवारणी करता येते.
- ड्रोनव्दारे फवारणीसाठी १०-२० लीटर पाणी लागते. फवारणीसाठी लागणारे पाणी पिकांच्या प्रकारावर व त्यांच्या व्याप्तीवर अवलंबुन असते.
- ड्रोनव्दारे द्रव्यरुप रासायनिक खतांची फवारणी करत असतांना नॅपसॅक पंपासाठी वापरण्यात येणाऱ्या मात्रे पेक्षा १.५ ते २.० पटीने मात्रा वाढवुन द्यावी.
- तसेच नॅनो युरीया/नॅनो डीएपी /नॅनो एन पि के ची फवारणी करीता हीच मात्र ५ ते १० पटीने वाढवून द्यावी.
ड्रोनव्दारे फवारणीसाठी द्रावण तयार करण्याची पध्दत
- प्रथमतः ड्रोनची टाकी स्वच्छ धुवावी.
- एका बादलीत द्रव्यरूप खतांचे द्रावण एकत्र चांगले मिसळुन घ्यावे.
- तयार द्रावण चांगले गाळुन घ्यावे.
- त्यानंतर ड्रोनच्या टाकीत टाकावे व फवारणी करावी.
- सुसंगत असलेली रासायनिक खते एकत्र मिसळावे अन्यथा मिसळू नये.
ड्रोनव्दारे फवारणी करण्यासाठी ड्रोनची उंची
- सर्व साधारण पिकांवर फवारणीसाठी ड्रोनची उंची पिकापासुन १.५ ते २.५ मीटर असावी.
- ज्या पिकांचा आधार सुटल्यास खाली पडु शकतात अशा पिकांवर फवारणी करत असतांना ड्रोनची उंची २ ते ३ मीटर असावी.
- उदा : बाजरी, ज्वारी, मका इत्यादी.
ड्रोन उडविण्याची गती
- सर्वसाधारणपणे ड्रोन उडविण्याची गती ३५ मीटर / सेकंद ठेवावी.
- ऊस पिकासाठी ड्रोनची गती २ ते ३ मीटर / सेकंद ठेवावी.
ड्रोनव्दारे फवारणीची वेळ
- उन्हाळ्यात सकाळी ६ वा. ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ३ वा. ते ६ वाजेपर्यंत असावी.
- हिवाळ्यात सकाळी ८ वा. ते १२ वाजेपर्यंत व सायंकाळी ३ वा. ते ६ वाजेपर्यंत असावी.
- पिक फुलोरावर असतांना ड्रोन व्दारे फवारणी करू नये.
- पाऊस पडत असतांना/धुके असतांना ड्रोनव्दारे फवारणी करणे टाळावे.
ड्रोनद्वारे फवारणी करत असताना घ्यावयाची काळजी
- शेतकऱ्यांना फवारणी करणे करता वापरण्यात येणाऱ्या द्रावणाविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
- जोरात वारा असताना ड्रोन द्वारे फवारणी करू नये.
- ड्रोन द्वारे पिकांच्या जवळून फवारणी करू नये.
- ड्रोन द्वारे फवारणी थंड हवामानात आणि कोवळ्या उन्हात केल्यास जास्त फायदेशीर ठरते.
- मृद विज्ञान विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी