अकोला : पिकांच्या उत्तम वाढीकरिता जमिनीचा वरील कठीण भाग मशागत साधनांच्या मदतीने तयार करून जमीन भुसभुशीत करणे याला जमिनीची मशागत म्हणतात. बागायती किंवा कोरडवाहू शेतीमधून चिरस्थायी उत्पादन मिळवण्यासाठी शाश्वत शेती करणे गरजेचे आहे. शेतीची नांगरणी लवकर केल्याने वावर उन्हात तळले जाते आणि त्यामुळे बुरशी नष्ट होऊन पिक तरारून येते, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.
शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीला फार महत्त्व आहे व विशेषतः उन्हाळी मशागतीचे अनेक फायदे आहेत. जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात कमी होते. जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकवून ठेवणे फार गरजेचे आहे.
खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून तापू दिली जाते. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. पूर्वी बैलांच्या सहाय्याने नांगरून जमिनीची मशागत व्हायची; परंतु आता ती ट्रॅक्टरद्वारे केली जाते. ट्रॅक्टरच्या मदतीने जमीन एक ते दीड फूट खोल नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेंटिमीटर खोलीपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. सध्या तीनही हंगामात पिके घेतली जात असल्याने जमिनीत सतत ओलावा असतो. त्यामुळे जमिनीत बुरशीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते
मातीत ओलावा राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते. त्यामुळे अन्नदव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची हालचाल व वाढ होण्यास मदत होते व परिणामी जमिनीची उत्पादकता वाढते.
उत्पादकता वाढण्यास मदत
उन्हाळी मशागत हे मुळात जमिनीचा खालचा थर वर येणं गरजेचे असते. जेणेकरून खालच्या बाजूला असलेल्या तणाच्या मुळ्या वर येऊन उन्हाने तळून जातील. तसेच आधीच्या हंगामातील पिकांमुळे घट्ट झालेले मातीचे कण मोकळे होऊन पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत होते. त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. तसेच जमिनीत भुसभुसीतपणा यावा म्ह्णून मशागत केली जाते. कारण जमीन भुसभुशीत झाल्याने पाऊस झाल्यानंतर तो जमिनीत मुरतो. जर जमीन नांगरली नाही तर पाऊस पडतो ते पाणी कडक जमिनीवरून पटकन वाहून जाते, ओल खोलपर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते. त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ