सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीचा जिवंतपणा हा केंद्रबिंदू मानला जातो. त्यानुसार जमिनीची सुपीकता आणि पोषकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या शेती तंत्राचा वापर केला जातो.
सर्वसाधारणपणे सेंद्रिय खताचा वापर, हिरवळीचे खत, जनवारांचे मलमूत्र, पिकांची फेरपालट, कंपोस्ट खत, गांडूळ खत, उपयुक्त जिवाणू संवर्धकांचा वापर इत्यादी बाबींचा जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी अंतर्भाव केला जातो.
हिरवळीच्या खतामध्ये मुख्यातः झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतींचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. बोरू, धैंचा, मुग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरून जमिनीत गाडली जातात.
याशिवाय गिरीपुष्प, सुबाभुळ इत्यादीच्या कोवळ्या फांद्या, पाने, जमिनीत गाडून कुजविली जातात. करंज, कडूनिंब, महूआ, गाजरफुली या सारख्या हिरवळीच्या खता मूळे जमिनीस सेंद्रिय पदार्थ पुरविले जातात.
हिरवळीच्या खताचे फायदे- पिकपोषक अन्न द्रव्यांची उपलब्धता वाढते.- जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो.- हवेतील नत्र शोषण करून जमिनीत साठविले जाते.- जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितली जाते.- जमिनीतील पोषक द्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.- उपयुक्त जीवणूचे प्रमाण वाढते.- जमिनीचा पोत सुधारतो.- जमिनीची जलधारणा शक्ति वाढते.- जमिनीची धूप कमी होते.- पिकांच्या दाट वाढीमुळे तंण नियंत्रणास मदत होते.
धैंचाजमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी धैंचा या हिरवळीच्या पिकाचा वापर केला जातो धैंचा हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीत पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देतात. एकरी २०-२५ किलो धैंचा बियाणे पेरणीसाठी पुरेशी आहेत. धैंचा फुलोऱ्यात असताना बळिराम नांगराच्या सहयाने जमिनीत गाडावा उभ्या पिकात जसे की भात, टोकण केलेला कापूस किंवा तूर यामध्ये धैंचा पीक घेत येते.
गिरीपुष्पगिरीपुष्प हे हिरवळीच्या खताचे अतिशय उपयुक्त पीक असून याची लागवड शेतीच्या बांधावर बिया किंवा कालमा द्वारे करावी. या वनस्पतीची पाने या कोवळ्या फांद्या बारीक करून सर्व पिकामध्ये हेक्टरी ६-८ टन आच्छादन करावे. पीक २५-३० दिवसांचे असताना याचा वापर करावा. हे हिरवळीचे खत एक आठवड्यात कुजून जावून पिकाला उपलब्ध होते.
हिरवळीचे खते आणि पोषक घटक
अ.क्र | पिके | नत्र | स्फुरद | पालाश |
१ | धैंचा | ३.५० | ०.६० | १.२० |
२ | सनहेम्प | २.३० | ०.५० | १.८० |
३ | हादगा | २.७१ | ०.५३ | २.२१ |
४ | गिरिपुष्प | २.७६ | ०.२८ | ४.६० |
५ | करंज | ३.३१ | ०.४४ | २.३९ |
प्रा. अपेक्षा कसबेविषय विशेषज्ञ (कृषिविद्या)प्रा. सचिन सूर्यवंशीकार्यक्रम समन्वयककृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर