'विमा सखी योजने'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची आणि स्थिर करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे. महिलांना अतिरिक्त उत्पन्न मिळाले तर त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील. या योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
काय आहे ही योजना
* विमा सखी योजनेत (Vima Sakhi Yojana) सहभागी होणाऱ्या महिलांना (Women) पॉलिसी विक्रीतून मिळणाऱ्या कमिशनव्यतिरिक्त सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी निश्चित स्टायपेंड दिला जाणार आहे.
* महिलांचे अंदाजे मासिक उत्पन्न ७ हजार रुपयांपासून सुरू होईल.
* महिलांना पहिल्या वर्षात प्रत्येक महिन्याला ७ हजार रुपये मिळतील.
* दुसऱ्या वर्षी मासिक पगार ६ हजार रुपये होईल.
* तिसऱ्या वर्षापर्यंत ही रक्कम ५ हजार रुपयांपर्यंत येईल. ज्या महिला विक्रीचे टार्गेट (Target) पूर्ण करतील किंवा त्यापेक्षा जास्त करतील, त्यांना अतिरिक्त कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
विमा सखीचे काम काय?
या योजनेअंतर्गत विमा एजंट (Insurance Agent) बनून या सखी लोकांमध्ये सर्वांसाठी विमा अभियान पसरवून कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतील. या संदर्भात त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कसे मिळेल मासिक वेतन आणि काय करावे लागेल?
* पहिल्या वर्षी तुम्हाला २४ लोकांचा विमा काढावा लागेल आणि पहिल्या वर्षी किमान ४८ हजार रुपये कमिशन (बोनस कमिशन वगळून) मिळवावे लागेल. पहिल्या वर्षी तुम्हाला दरमहा ७ हजार रुपये स्टायपेंड (Stipend) मिळेल.
* दुसऱ्या वर्षी स्टायपेंड ६ हजार रुपये असेल पण, यासाठी पहिल्या वर्षी घेतलेल्या किमान ६५% पॉलिसी (Policy) दुसऱ्या वर्षाच्या शेवटपर्यंत लागू राहणे आवश्यक आहे.
* तिसऱ्या वर्षी तुम्हाला ५ हजार रुपये स्टायपेंड मिळेल, ज्यासाठी दुसऱ्या वर्षी घेतलेल्या किमान ६५% पॉलिसी तिसऱ्या वर्षाच्या अखेरीपर्यंत सक्रिय राहणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी पात्रता आणि शर्ती काय?
* विमा सखी होण्यासाठी तुमचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तसेच महिलांनी दहावी उत्तीर्ण केलेले असावे.
* अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या LIC शाखेला भेट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता.
* तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. या योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.
* यामध्ये दोन नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्व-साक्षांकित प्रत जोडावी लागेल. तसेच, बँक खात्याचा तपशील सादर करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
सखींनी त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. नावनोंदणी तपशील आणि अर्जाचा फॉर्म LIC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.अर्ज करण्यासाठी या लिंकवर जाऊन क्लिक करा https://agencycareer.licindia.in/agt_req/New_Lead_Sakhi_Candidate_Data_entry_For_NewWeb.php
एका वर्षाच्या आत १ लाख विमा सखींना पॅनेलमध्ये समाविष्ट करणे हे या विमा सखी योजनेचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण महिलांना विमा एजंट बनवून त्यांना स्वत: च्या पायावर उभे करण्यासाठी आणि ग्रामीण भागात विम्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ही खास योजना आणण्यात आली आहे. LIC विमा सखी योजनेमुळे फक्त ग्रामीण भागातच नाही, तर दुर्गम भागातील महिलांसाठी उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.