थंडी सुरू झाली की, खवय्यांना वेध लागतात ते वालाच्या शेंगांच्या पोपटीचे. पोपटीसाठी अनेक खवय्ये स्थानिक वालाच्या शेंगाना पसंती देतात. मात्र, अद्याप स्थानिक वालाच्या शेंगा पुरेशा प्रमाणात तयार झाल्या नसल्याने सध्या घाट माथ्यावरून येणारा पावटा पोपटीसाठी उपयोगात आणला जात आहे. हा पावटाच पोपटीची रंगत अन् चव वाढवत आहे.
अलीकडे थंडी सुरू झाल्यानंतर शेतात लावली जाणारी पोपटी ग्रामीण भागात सुरू झाली असून, वालाच्या शेंगांचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. वालाऐवजी भाजी बाजारात सहज उपलब्ध होणारा पावटा खवय्यांच्या पसंतीस उतरत असून, गावाकडील खवय्ये पोपटीसाठी पावट्याच्या शेंगा विकत घेत आहेत.
७० रुपये किलोने मिळताहेत पावट्याच्या शेंगा
• मडक्यात शिजवल्या जाणाऱ्या शेंगांची चव उत्कृष्ट असल्याने ग्रामीण व शहरी भागात काही दिवसांपासून पोपटीचे बेत आखले जात आहेत.
• खवय्ये मित्र परिवारासह शेतात व उघड्या माळरानावर एकत्र येत पोपटी लावत आहेत. सध्या वालाच्या शेंगा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे घाटमाथ्यावरून मुबलक येत असलेल्या पावट्याच्या शेंगांना ग्राहकांची पसंती मिळत असून, ७० रुपये किलोने पावट्याच्या शेंगा मिळत आहेत.
अशी लावली जाते पोपटी
• पोपटी लावण्यासाठी चांगले मातीचे रुंद तोंडाचे मडके लागते. ओल्या वालाच्या किंवा पावट्याच्या शेंगा, चवीपुरते मीठ, मसाला, कांदे, चिरलेले बटाटे आदी पदार्थ या मडक्यात शेंगांचे थर रचून ठेवतात.
• भामरुडसारख्या वनस्पतीने मडक्याचे तोंड बंद करतात, २० ते २५ मिनिटे पाला, पाचोळा, गवताने पेटवून या मडक्याला उष्णता देतात.
• त्यानंतर योग्य शिजलेल्या या शेंगा खाण्यासाठी तयार होतात. जाणकार मंडळी पोपटी लावण्याचे काम उत्तम करतात. त्याची चवही अत्यंत वेगळी असते.