महाराष्ट्र राज्यात आशियायी विकास बॅकेच्या (ADB) सहाय्याने डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल), आंबा, काजू, लिंबू, पडवळ व फुलपिके या १५ पिकांची उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मुल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत रु.४१६.७१ कोटी (चारशे सोळा कोटी एकाहत्तर लक्ष) निधी वितरीत करण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख १४ फळपिके (डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल), आंबा, काजू, लिंबू, पडवळ) व सर्व प्रकारची फुले अशा एकूण १५ फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन ते ग्राहकांपर्यंत वितरण अशा एकात्मिक मुल्य साखळ्यांचा विकास मॅग्नेट प्रकल्पामार्फत करण्यात येत आहेत.
यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), निर्यातदार, प्रक्रीयादार, संघटीत किरकोळ विक्रेते, कृषि व्यावसाय करणारे लघु व मध्यम उद्योजक, वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समुह यांचा सहभाग आहे.
प्रकल्पाचे मुख्य उद्देश
राज्यातील १४ फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणुक क्षमता वाढविणे. मागणीनुसार मालाची मुल्यवृद्धी करणे आणि वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे. शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविणे.
प्रकल्पाचे हे उद्देश साध्य करण्यासाठी उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटीत बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा उभारणीसाठी सहाय्य, मध्यम मुदत कर्ज आणि खेळते भांडवल पुरविणे.
मॅग्नेट प्रकल्पाचा वित्तीय आराखडा, कालावधी व अंमलबजावणी १४२.९ दशलक्ष अमेरीकन डॉलर्स. (सुमारे रू. ११००.०० कोटी) प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६ वर्षांसाठी (सन २०२१-२२ ते २०२७-२८ पर्यंत) राबविण्यत येत आहे.
दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे आशियाई विकास बॅंक व केंद्र शासन यांच्यामध्ये कर्ज करारावर व आशियाई विकास बॅंक, राज्य शासन व मॅग्नेट संस्था यांच्यामध्ये प्रकल्प करारावर स्वाक्षरी करण्यात आली. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी Loan effective झाले आहे.
मॅग्नेट प्रकल्पाची अपेक्षित फलनिष्पत्ती
पुढील 6 वर्षात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची पुढील प्रमुख फलनिष्पत्ती अपेक्षित आहेत. मॅग्नेट प्रकल्पातील समाविष्ट फलोत्पादन पिकांमधील शेतकरी उत्पादक संस्था व मुल्य साखळी गुंतवणुकदारांच्या एकूण ३०० उपप्रकल्पांना मदत करणे.
सुमारे २ लाख शेतकऱ्यांना (पुरेशा महिला प्रतिनिधित्वासह) सर्व समावेशक व कार्यक्षम पर्यायी मूल्य साखळ्यांच्या माध्यमातून बाजाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. सुमारे १०,००० लोकांना रोजगार/स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतील.
प्रकल्पातील विविध उपघटकांच्या अंमलबजावणीमुळे पिकांची गुणवत्ता व अन्न सुरक्षितता मानकांच्या अवलंबामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना किमान १० टक्के वाढीव किंमत मिळेल.
प्रकल्पातील तीन मुख्य घटक
घटक १) शेतकरी उत्पादक संस्थांचा क्षमता विकास करणे
यामध्ये निवडण्यात आलेल्या १४ फलोत्पादन पिकांसाठी व फुलांसाठी शेतकरी उत्पादक संस्थांना उत्पादकता व गुणवत्ता वाढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक पिक पद्धतींचा वापर, काढणी पश्चात हाताळणी, निर्यात व देशांतर्गत बाजारपेठेनुसार अन्न सुरक्षा आणि गुणवत्तांची पुर्ताता करणे इ. विषयी प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या घटकांतर्गत मॅग्नेट प्रकल्पात समाविष्ट फलोत्पादन पिकांमध्ये कामकाज करणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्थांना पुढील बाबींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
उत्तम कृषी पद्धती (GAP)
गॅपबाबत संबंधित पिक उत्पादन क्षेत्रामध्ये (Crop Cluster) १ दिवसीय प्रशिक्षण देण्यात येते.
शेतकरी उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण
मॅग्नेट प्रकल्पातील पिकांसाठी दोन दिवशीय व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. शेतकरी उत्पादक संस्था/मुल्यसाखळी गुंतवणुकदार प्रतिनिधींसाठी
काढणीपश्चात व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण
शेतकरी उत्पादक कंपन्या व मुल्य साखळी गुंतवणुकदारांचे प्रतिनिधींना दोन दिवशीय काढणीपश्चात व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.शेतकरी उत्पादक कंपन्या व मुल्य साखळी गुंतवणुकदार यांचे प्रतिनिधींना निर्यातदार बनविण्याच्या दृष्टीने ५ दिवसीय निवासी फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण देण्यात येते.
घटक २-अ) मुल्यसाखळीतील अंतर्भुत घटकांना (शेतकरी उत्पादक संस्था व खाजगी गुंतवणुकदार) काढणीपश्चात पायाभूत सुविधा उभारणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे मॅचिंग ग्रॅन्ट या घटकांतर्गत शेतकरी उत्पादक संस्था आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार यांच्या पात्र उपप्रकल्पांना काढणीपश्चात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पात्र प्रकल्प किंमतीच्या ६०% पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्थसहाय्य निकष
प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध होणारे आर्थिक सहाय्य हे मॅचिंग ग्रँट स्वरुपात असणार आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी कमाल अनुदान हे पात्र प्रकल्प किंमतीच्या ६०% पर्यंन्त राहणार असून ते प्रति प्रकल्प जास्तीत जास्त सहा कोटी रुपये पर्यंत देय असणार आहे. मंजूर अनुदानाचे वितरण लाभार्थी संस्थेला तीन टप्प्यांमध्ये करण्यात येते.
घटक २ ब) शेतकरी उत्पादक संस्था व मुल्य साखळी गुंतवणुकदार यांची खेळत्या भांडवलाची व मध्यम मुदत कर्जाची गरज भागविण्यासाठी भागीदारी वित्तीय संस्थांमार्फत सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे. राज्यातील मॅग्नेट प्रकल्पातील फलोत्पादन पिकांमध्ये कामकाज करणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था व मुल्यसाखळी गुंतवणुकदारांची मध्यम मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाची गरज विचारात घेवुन आशियाई विकास बँकेमार्फत FIL या घटकाचा समावेश मॅग्नेट प्रकल्पामध्ये केलेला आहे.
या घटकाअंतर्गत एकुण वित्तीय आराखडा रु.४८५.०० कोटी रुपये इतका आहे. रू.४८५.०० कोटींपैकी Financial Intermediation Loan (FIL) या घटकाच्या अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडिया, फेडरल बॅंक व समुन्नती फायनान्सियल इंटरमेडीएशन ॲन्ड सर्व्हीसेस प्रा. लि. या तीन वित्तीय संस्थांची निवड करण्यात आलेली आहे. शेतकरी उत्पादक संस्था व मुल्य साखळी गुंतवणुकदार यांना वित्तीय संस्था सदर कर्जासाठी सद्यस्थितीत जवळपास १०% इतका व्याजदर आकारणी करतात.
घटक ३) निवडण्यात आलेल्या फलोत्पादन पिकांसाठी मुल्य साखळ्या विकसित करणे
यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या १६ सुविधांचे विस्तारीकरण/आधुनिकीकरण, तीन नवीन सुविधांची उभारणी आणि राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे बळकटीकरण इ. बाबींचा समावेश आहे. या घटकाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.