पुणे : दिवसेंदिवस शेती क्षेत्रामध्ये नवनवे तंत्रज्ञान येत आहेत. यामुळे शेतीमध्ये लागणारे कष्ट आणि मनुष्यबळ कमी होताना दिसत आहे. तर सध्या कमी खर्चामध्ये शेती मशागत करणारे तंत्र विकसित केले जात आहेत. त्याचप्रमाणे बुलेट ट्रॅक्टर बाजारात आले असून त्याची निर्मिती चार वर्षांपूर्वी मकबूल शेख यांनी केली आहे. या ट्रॅक्टरद्वारे आपण शेतीतील अनेक कामे एकाच वेळी करू शकतो. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पार पडलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता.
दरम्यान, या ट्रॅक्टरद्वारे फवारणी, पेरणी, कोळपणी, वखरणी, डवरणी, उसाला माती लावणे, रोटाव्हेटर, पाळी घालणे, फवारणी करणे, ट्रॉलीतून माल वाहतूक करणे अशी कामे करता येतात. त्याचबरोबर एकाच वेळी २० फूटापर्यंतच्या क्षेत्रात फवारणी करता येते. त्याचबरोबर मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा या ट्रॅक्टरला कमी इंधन लागते आणि जास्त काम होते. त्यामुळे हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो.
किती लागते इंधन?
- एका लीटर डिझेलमध्ये सव्वा ते दीड तास ट्रॅक्टर चालतो
- एक एकर फवारणीसाठी - ८०० मिली डिझेल
- एक एकर पेरणीसाठी - १ लीटर डिझेल
- एक एकर पाळी घालण्यासाठी - १ लीटर डिझेल
ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
- तीन चाकी ट्रॅक्टर
- १०एचपीचे इंजिन
- सगळी कामे एकत्र करता येतात
- कमी इंधनात जास्त कामे
दिवसेंदिवस शेतीमधील खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यासाठी अशा प्रकारचे उत्पादने शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकतात.