Join us

खूशखबर! आंबा कलमे मोहरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 17:05 IST

जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या या मोहराचे 'फळ' मार्चमध्ये मिळण्याची आशा आहे.

रत्नागिरी : पावसाने वेळेत घेतलेली एक्झिट, योग्य प्रमाणातील ऑक्टोबर हीट आणि आता थंडीची सुरुवात, यामुळे यंदा पारंपरिक वेळापत्रकाच्या मुहूर्तावर हापूसची कलमे मोहरली आहेत. जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या या मोहराचे 'फळ' मार्चमध्ये मिळण्याची आशा आहे. त्यामुळे बागायतदार सुखावले आहेत.

गेली काही वर्षे हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे हापूसचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळेच गतवर्षीही हापूसचे उत्पादन घटले. तसेच केलेला खर्चही न मिळाल्याने सर्वच बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

यंदाची परिस्थिती हापूसला अनुकूल अशी आहे. पाऊस त्याच्या मूळ वेळापत्रकानुसार सप्टेंबरअखेरीस थांबला. ऑक्टोबर हीट पुरेशी होती. आता थंडीची सुरुवात होताच झाडांच्या मुळांवर ताण पडल्याने कलमे मोहरली आहेत. दिवाळीपूर्वी पडलेल्या वादळी पावसामुळे तुडतुडा, कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता.मात्र, लगेचच केलेल्या फवारण्यांमुळे तोही आटोक्यात आला. सध्याच्या वातावरणात थंडी अजून वाढली तर मोहरापासून कणी व त्यातून कैरीची वाढ लवकर होईल, असे बागायतदार सांगत आहेत.

कोट्यवधींची उलाढालजिल्ह्यात ६६ हजार ४३३ हेक्टर १ क्षेत्रावर आंबा लागवड असून. हेक्टरी उत्पादकता दोन टन आहे. दरवर्षी जिल्ह्यात आंबा हंगामावर ५०० ते ७०० कोटींची उलाढाल होते. मात्र, गेली काही वर्षे हे पूर्ण गणित विस्कटले आहे. यंदा पहिल्या टप्प्यातील परिस्थिती तरी हापूससाठी अनुकूल अशीच आहे.

थंडी वाढायला हवीसध्या जिल्ह्यात कमाल ३३ अंश, तर किमान २६ अंश इतके तापमान असून, दिवसा ऊन व रात्री गारठा पडू लागला आहे. गारठा वाढल्यास मोहर प्रक्रियेत वाढ होईल, असे शेतकरी सांगत आहेत. पारा १८ अंशांपर्यंत घसरल्यास पोषक ठरणार आहे.

मार्चमध्ये मिळेल 'फळ'सध्या आलेल्या मोहराला कणी ३ दिसू लागली आहे. हा आंबा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मार्चमध्ये बाजारात येईल. सध्या पालवी, मोहर ते कणी अशा तीनही अवस्था झाडावर दिसत आहेत. आता जिथे पालवी आहे, त्याचा आंबा मिळण्यासाठी मे महिना उजाडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आकडे

  • यंदाची आंबा लागवड - ६६,४३३ हेक्टर
  • उत्पादन - १ ते सव्वालाख टन
  • दरवर्षीची आर्थिक उलाढाल - ७०० ते ८०० कोटी रूपये
  • २० हजार टन आंब्यावर स्थानिक पातळीवर होते प्रक्रिया
  • ६० हजार टन आंबा विक्रीसाठी बाहेर जातो
  • ३० हजार टन आंबा कॅनिंगसाठी जातो बाहेर

 

गतवर्षी आंबा पीक अत्यल्प होते. यावर्षी सध्यातरी पिकासाठी पोषक हवामान आहे. काही ठिकाणी पालवी आहे, तर काही ठिकाणी कोंब येत असून, काही झाडांना मोहर फुलला आहे. फुलल्या मोहराला कणी लागली आहे. तुडतुडा, किडींचा प्रादुर्भाव असल्याने कीटकनाशक फवारणी सुरु केली आहे. थंडी वाढली तर मोहर चांगला येईल, अशी अपेक्षा आहे.

- राजन कदम, बागायतदार

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीआंबाबाजार