Lokmat Agro >स्मार्ट शेती > महाराष्ट्राची पारंपरिक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर

महाराष्ट्राची पारंपरिक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर

Maharashtra's traditional crops are on the verge of extinction | महाराष्ट्राची पारंपरिक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर

महाराष्ट्राची पारंपरिक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर

शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अशा कारणांनी ही पारंपरिक पिके करणारे शेतकरी संकटात आले आहेत.

शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अशा कारणांनी ही पारंपरिक पिके करणारे शेतकरी संकटात आले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चार प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील बदलती पीक पद्धती या विषयावर एक संशोधनात्मक अभ्यास मांडला आहे. यासाठी त्यांनी २००१ ते २०२१ हा दोन दशकांचा कालावधी निवडला आहे.

तसा हा फार मोठा कालावधी नसला तरीदेखील महाराष्ट्राच्या विविध विभागातील पीक पद्धती प्रचंड वेगाने बदलत असल्याचे समोर येते आहे. या अभ्यासातून महाराष्ट्राने जागे व्हायला हवे आणि अन्नसुरक्षेचे तसेच उत्तम अन्न उत्पादन प्रक्रियेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

हा प्रमुख निष्कर्ष या अभ्यासातून पुढे येतो आहे आणि महाराष्ट्राने वेळीच याची दखल घेतली नाही तर पौष्टिक अन्नधान्य पुरवठ्याची साखळी संपुष्टात येऊ शकते. हा अभ्यास पाहता अनेक पारंपरिक पिके नजीकच्या कालावधीत नष्ट झाली तर आश्चर्य वाटायला नको, अशी अवस्था आहे.

शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अशा कारणांनी ही पारंपरिक पिके करणारे शेतकरी संकटात आले आहेत.

खरीप ज्वारीचे उत्पादन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागातून वेगाने कमी होत आहे. याउलट विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढते आहे. काही दशकांपूर्वी आलेले हे पीक आता प्रमुख पीक बनले आहे. याउलट ज्वारी, बाजरी, नाचणी काही प्रमाणात धान, कडधान्ये, तृणधान्ये ही पिके संपतात की काय, अशी अवस्था आहे.

पश्चिम महाराष्ट्रातदेखील या पिकांची हीच अवस्था आहे. ज्वारी जवळपास संपुष्टात आली आहे. भात उत्पादन मर्यादित आहे. गहू, हरभरा, इतर कडधान्ये यांचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घटले आहे, असे हा अभ्यास सांगतो आहे. याउलट उसाला किमान आधारभूत भाव मिळण्याची हमी मिळाल्याने या दोन दशकांत पश्चिम महाराष्ट्रात उसाखालील लागवडीचे क्षेत्र पंचवीस टक्क्यांनी वाढले आहे.

भाताची उत्पादकता वाढली असली तरी क्षेत्र कमी झाले आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजीपाला नगदी पीक म्हणून क्षेत्र वाढत आहे. कोकणात फळबाग लागवडीला मोठे यश मिळाल्याने पारंपरिक भात उत्पादन घटत आहे. भाताची नवी वाणे आल्याने उत्पादनात वाढ असली तरी क्षेत्र मात्र कमालीचे घटत आहे. याची विविध कारणे आहेत, त्यात मनुष्यबळाचा अभाव हे प्रमुख कारण आहे.

मराठवाडा एकेकाळी ज्वारी, बाजरी, कडधान्ये, आदी उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. रब्बी हंगामालादेखील ज्वारी आणि गव्हाचेही उत्पादन चांगले होते. याउलट खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पादन वाढत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आणि तृणधान्ये यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. महाराष्ट्रातील पीक पद्धती बदलण्यास प्रामुख्याने शेतकऱ्यांना आर्थिक परतावा किती मिळतो, हा निकष आहे.

पश्चिम महाराष्ट्र ऊस
ऊस आणि भाजीपाला उत्पादनवाढ वगळता ज्वारी, बाजरी, कडधान्ये, भूईमूग आदीचे उत्पादन घटले.

विदर्भात घटच
विदर्भात ज्वारीचे पीक सपुष्टात येत आहे. धानाचे उत्पादन स्थिर असले तरी, सोयाबिन उत्पादनात वाढ आहे.

मराठवाडा संकटात
ज्वारी आणि कडधान्यासाठी मराठवाडा प्रसिद्ध होता. मात्र या दोन्ही पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटत आहे. कापूसही कमी झाला. खानदेशातही हाच प्रकार दिसतो आहे.

कोकणात फळबागा
भाताचे कोठार म्हणून कोकणाची ओळख होती, आता आंबा, काजूसाठी अनेक नवीन वाण आल्याने भाताचे क्षेत्र घटत आहे.

कापूस, सोयाबिन या पिकांच्या लागवडी खालील क्षेत्रात फार मोठा बदल होत नाही. मात्र ज्वारी, बाजरी यांची मागणी घटत आहे. मका, गहू, कडधान्ये यांची उत्पादनवाढ होत नाही. परिणामी आर्थिक परतावा कमी मिळतो आहे. ज्या विभागात सिंचनाखालील क्षेत्र वाढले आहे, तेथील पीक पद्धतीत आमूलाग्र बदल जाणवतात.

उदा. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांत सिंचन वाढल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्र पंचवीस टक्क्यांनी वाढले आहे. याउलट कापूस पीक जवळ जवळ संपुष्टात आले आहे. ज्वारी, कडधान्येही ही पिके घटली आहेत, मात्र भाजीपाला आणि फळबागांचे क्षेत्र वाढले आहे.

अशा निष्कर्षावर काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा या पीक पद्धतीच्या बदलाचा परिणाम काही पिके नष्टच होऊन जातील, अशी भीती आहे. विदर्भातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलास रोखायचे असेल तर कापूस, धान, आदी पिकांच्या उत्पादनाला आधारभूत भाव देण्याची योजना आखावी लागेल.

खरीप ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते आहे. ज्वारी हे उत्तम अन्नधान्य आहे. शिवाय ज्वारीपासून पशुधनासाठी चारा उपलब्ध होतो. ज्वारीच्या वाणांचे संशोधन करून अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करायला पाहिजे. ज्वारीवर आधारित उपपदार्थ तयार करणारा प्रक्रिया उद्योग वाढ अपेक्षित आहे.

डॉ. वसंत भोसले
संपादक, लोकमत कोल्हापूर

Web Title: Maharashtra's traditional crops are on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.