तुर हे प्रमूख डाळवर्गीय पिक आहे. डाळवर्गीय पिकांवर पेरणीपासून पीक निघेपर्यंत जवळजवळ २०० प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. साठवणुकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वत:चे पोषण करतात.
परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे. कधी कधी साथीच्या स्वरुपात कीड आल्यास ७० टक्के पेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या किडीपासून होते. तूर पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि नुकसानीचा प्रकार कसा ते पाहूया.
१) शेंगा पोखरणारी अळी/घाटे अळी
ओळख व जीवनक्रम:
- मादी कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगावर अंडी घालते.
- एक मादी सरासरी ६०० ते ८०० अंडी घालते.
- अंडी अवस्था ३ ते ४ दिवसांची असते. किडी
- अळी ६ अवस्थातून जाते. १८ ते २५ दिवसांनी जमिनीत मातीच्या वेष्टनात अथवा झाडाच्या पालापाचोळयात कोषावस्थेत जातो.
- कोषावस्था ७ ते १४ दिवसांची असते.
- डिसेंबर/जानेवारीत आभाळ ढगाळ असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
नुकसानीचा प्रकार:
- अंडयातून बाहेर निघालेली अळी अगोदर तुरीची कोवळी पाने खाते.
- पिक फुलोऱ्यात आल्यावर कळ्यावर उपजिवीका करते.
- नंतर शेंगा लागल्यावर शेंगांना छिद्र पाडून शरीर बाहेर ठेवून आतील दाणे खाते. त्यामुळे फळधारणेचे प्रमाण कमी होते.
- तसेच मोठ्या अळ्या शेंगाना छिद्रे करुन आतील दाणे पोखरुन खातात.
२) पिसारी पतंग
ओळख व जीवनक्रम:
- मादी कोवळे देठ, पाने, फुले व लहान शेंगावर रात्रीच्या वेळी अलग अंडी घालते.
- एक मादी साधरणपणे १७ ते १८ अंडी घालते.
- अंडी २ ते ५ दिवसांत ऊबतात.
- अळी १० ते १६ दिवसांनी पूर्ण वाढल्यानंतर शेंगेवर अथवा शेंगेवरील छिद्रात कोषावस्थेत जाते.
- कोषावस्था ४ ते ७ दिवसाची असून ह्या किडीची एक पिढी १७ ते २८ दिवसानी पूर्ण होते.
- ही कीड पावसाळा संपल्यानंतर तुरीवर मोठया प्रमाणात क्रियाशिल असते.
नुकसानीचा प्रकार:
- ह्या अळीचा प्रादुर्भाव साधारणत: पावसाळा संपल्यावर मोठ्या प्रमाणावर होतो.
- अंडयातुन बाहेर पडलेली अळी सुरुवातीला कळ्या, फुले, व शेंगाना छिद्र पाडुन दाणे खाते.
- पुर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरवडुन खाते व नंतर बाहेर राहुन आतील दाण्यावर उपजिविका करते.
३) शेंग माशी
ओळख व जीवनक्रम:
- मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते.
- ही अंडी ३ ते ८ दिवसात उबतात.
- अळी अवस्था १० ते १८ दिवसांची असून पूर्ण वाढ झालेली अळी शेंगेतच कोषावस्थेत जाते.
- कोषावस्था ४ ते ९ दिवसांची असते.
- शेंगमाशीचा जीवनक्रम ३ ते ४ आठवड्यात पूर्ण होतो.
नुकसानीचा प्रकार:
- सुरुवातीस शेंगमाशीच्या प्रादुर्भावाचे कोणतेही लक्षण शेंगेवर दिसत नाही. परंतु जेव्हा वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातुन माशी बाहेर पडते तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो.
- अळी शेंगेत प्रवेश करुन अर्धवट दाणे खाते तसेच दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. यामुळे बुरशीची वाढ होते व दाणे कुजतात.
४) ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी
ओळख व जीवनक्रम:
- कमी कालावधी असणाऱ्या जाती विशेष बळी पडतात.
- फुलोरा येण्याच्या कालावधीमध्ये जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असते.
- सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये ही अनुकूलता ह्या किडीस मिळाल्याने त्यांची पुनरुत्पादन जलद होते.
नुकसानीचा प्रकार:
- पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळ्या व फुले एकत्र गुंडाळते.