मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आहे. लष्करी अळी मक्यातील पोंगा किंवा कोंब खाते, त्यामुळे ते मक्याचे झाड किंवा मका पूर्णपणे निरूपयोगी होतो.
मका पिकावर प्रादुर्भाव झाल्यास मका पिकाचे क्षेत्र मोडण्या शिवाय किंवा पीक काढून टाकल्या शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यापूर्वी आपल्याला अळीची ओळख आणि नुकसान याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत पीक अवस्थेनुसार करावयाचे व्यवस्थापन (एकात्मिक कीड नियंत्रण)
१) पिकाचे आठवड्यातून किमान दोन वेळा नियमित सर्वेक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव ओळखणे शक्य होते.
२) अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ५ कामगंध सापळे वापरावे.
३) किडींचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंग पकडून व रॉकेल मिश्रीत पाल्यात बुडवून मारावेत.
४) किडींचे अंडीपुंज व जास्तीत जास्त अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
५) शेतातील बांध तणमुक्त ठेवावे जेणेकरून प्रमुख पीक उपलब्ध नसल्यास तणावर उपजिविका करणार नाही.
६) पिकाची काढणी लवकर करावी त्यामुळे नंतरच्या हंगामातील किडींच्या प्रादुर्भावातून सुटका होईल.
जैविक नियंत्रण
१) रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्थेत ५ टक्के पोंग्यामध्ये तसेच १० टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी.
२) बॅसीलस थुरिंजिनिसिस व कुर्सटाकी २० ग्रॅम/१० लि. पाणी किंवा ४०० ग्रॅम/एकर याप्रमाणे फवारणी करावी.
रोपे ते सुरूवातीची पोंगे अवस्था
अंड्याची उबवण क्षमता कमी व सूक्ष्म अळ्यांच्या नियंत्रणासाठी ५ टक्के प्रादुर्भाव असल्यास, ५ टक्के निर्बोळी अर्क किंवा अॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम, ५० मि.ली. प्रति १० लिटर याप्रमाणे फवारणे.
मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था
१) अळी पोंग्यामधे उपजिवीका करीत असल्यामुळे रासायनिक किटकनाशकाची जास्त घनफळाच्या फवारणी (नॅपसॅक) पंपाद्वारे फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण पोंग्यात जाऊन नियंत्रण मिळते.
२) रासायनिक किटकनाशकांचा वापर फवारणी सायंकाळी किंवा सकाळी करावी. तसेच द्रावणाचे जाडसर तुषार पोंग्यामध्ये पडेल अशा प्रकारे फवारणी करावी म्हणजे अळ्यांचे प्रभावी नियंत्रण करता येईल.
३) चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये त्याऐवजी जैविक किटकनाशकाचा वापर करावा.
गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणी नंतर ८ आठवडे)
या अवस्थेत रासायनिक किटकनाशकांचा वापर किफायतशीर नाही. म्हणून मोठ्या अळ्या वेचाव्या.
अधिक वाचा: झेंडू पिकाचे शेतीमध्ये होणारे असंख्य फायदे माहिती आहेत का? वाचा सविस्तर