सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्त्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास सेंद्रिय शेतीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. नावाप्रमाणेच या अर्कात दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो.
वेगवेगळ्या उग्र वासाच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो. १० वनस्पती ज्यांना जनावरे खात नाहीत अता दहा विविध प्रकारच्या वनस्पतीच्या पानाचा अर्क म्हणजे दशपर्णी अर्क होय. सेंद्रिय शेती अथवा रसायन अंशमुक्त शेतीमध्ये दशपर्णी अर्काचा वापर केला जातो.
दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत
१) कडूलिंबाचा पाला, २) पपईचा पाला, ३) रुई, ४) एरंड, ५) कन्हेर, ६) सीताफळ, ७) करंज, ८) धोत्रा, ९) टणटणी, १०) निरगुडी, ११) गुळवेल.
- वरीलपैकी कोणत्याही दहा वनस्पतींचा पाला समप्रमाणात घ्यावा. एखाद-दुसरी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालू शकतो.
- सर्वसाधारणतः प्रत्येक वनस्पतीचा पाला ५ किलो, १० किलो देशी गाईचे शेण, (शेण ताजे घ्यावे. सुकलेले वापरू नये), ५ लिटर देशी गोमूत्र घ्यावे.
- गोमूत्र जुने साठविलेले असले तरी चालते. (गोमूत्र जितके जुने, तेवढा त्याचा औषधी गुणधर्म जास्त असतो).
- हे सर्व मिश्रण प्लॅस्टिकच्या ड्रममधे घ्यावे. त्यात गरजेइतके म्हणजे मिश्रण ढवळता येईल या प्रमाणात पाणी घ्यावे.
- सर्वसाधारणपणे २० ते २५ लिटर पाणी असावे. जेणेकरून मिश्रण जास्त घट्ट होणार नाही व ढवळण्यास सहज व सोपे जाईल.
- पाण्याचे प्रमाण अति जास्तही नसावे की ज्यामुळे द्रावण अति पातळ होईल.
- सर्व घटक ड्रममधे टाकल्यानंतर त्याचे झाकण पातळ कपड्याने झाकावे.
- दिवसातून कमीत कमी दोन वेळेस मिश्रण ढवळावे.
- ढवळून झाल्यावर झाकण पुन्हा व्यवस्थित बांधून ठेवावे.
- ही क्रिया ३० दिवस चालू ठेवावी. या कालावधीत सर्व मिश्रण व्यवस्थित तयार होते.
- तयार झालेले द्रावण पातळ कपड्याने गाळून घ्यावे.
दशपर्णी अर्काचा वापर
- दशपर्णी अर्क किडी-रोग आदींच्या नियंत्रणासाठी उपयोगी असतो.
- दशपर्णी अर्कात वेखंड पावडरीचाही वापर करता येतो. प्रति १५ लिटर पाण्यात दोन ते अडीच लिटर दशपर्णी अर्क वापरावा.
- दोन फवारण्यांमधील अंतर ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त असू नये.
- फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करावी.
- दशपर्णी अर्क साठवून ठेवता येतो.
- अर्क तयार झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत वापरता येतो. फक्त तो बंद झाकणाच्या कॅनमध्ये व्यवस्थित ठेवावा.
- शेतकरी त्यांच्या गरजेनुसार कमी-जास्त प्रमाणात, योग्य प्रमाणात दशपर्णी व इतर घटक वापरून हे मिश्रण तयार करू शकतात.
अधिक वाचा: गो कृपा अमृतम् बनवा घराच्या घरी... बनविण्याची सोपी पद्धत