Join us

मशागतीची माळशेज पट्ट्यात लगबग; ड्रोनने होतेय फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 12:51 PM

शेतकऱ्याकडून आता कोळपणी खुरपणी आणि फवारणी या मशागतीच्या कामांना वेग दिला जात असला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

 जुन्नर तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्या जुलैमध्ये कराव्या लागल्या. पावसाने तब्बल एक महिना उशिरा हजेरी लावल्याने पेरण्यासाठी जुलै उजाडला. आता जुलै महिना संपत आलेला असताना विहीर, नदी, नाले, ओढे, तलावात अत्यल्प वाढ असल्याने अल्प पावसावर पिके जोमदार आहेत.  शेतकऱ्याकडून आता कोळपणी खुरपणी आणि फवारणी या मशागतीच्या कामांना वेग दिला जात असला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

गत आठवडाभरापासून संततधार भीज पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतात वापसा नसल्याने खरिपातील आंतरमशागतीच्या कामांवर परिणाम झाला होता, सोयाबीन, मका, मूग, तूर या पिकांत गवत वाढले असून, खुरपणी, वखरणी, खताची मात्रा देणे, कीटकनाशक फवारणी करणे ही कामे खोळंबली होती. त्यामुळे सोयाबीन पिकावर मावा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी पीकांवर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात येत आहे.

दरम्यान, माळशेज परिसर आतापर्यंत १०० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पावसाचे प्रमाण कमी असल्याने तसेच मागील , आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिपातील आंतरमशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. परिणामी, सोयाबीन व अन्य पिकांमध्ये तण वाढले आहे. पिकांना खतांची मात्रा देणे, कीटकनाशक फवारणी करणे, आदी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पिकांवर रोगराई वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आसमंत हिरवागार, पाऊस अपुरासध्या गेल्या दीड महिन्यात झालेल्या हलक्याश्या पावसामुळे आसमंत हिरवागार दिसत आहे. पेरलेल्या पीकांची उगवणही झालेली आहे, मात्र पिकांची वाढ झाल्यानंतर भूक वाढणार व पाणी जास्त लागणार आहे. यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे माळशेज परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. आता शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

पावसाची प्रतीक्षाजुन्नर तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रफळावर खरिपाची पेरणी होते. उर्वरित भागातील पेरण्या उरकून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या अल्प पावसावर पेरणी झाल्यापासून दमदार पावसाची आठवडा भर अल्प रिमझिम पावसाने सध्या पडत असलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांकडून फवारणी कोळपणी, खुरपणी या आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला जात आहे. सध्या पिके लहान असल्यामुळे भूक भागत आहे.

टॅग्स :खरीपकीड व रोग नियंत्रणलागवड, मशागतशेतकरी