जळगाव जिल्ह्यात रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावात केळी पिकावर कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. लागवडीच्या सुरूवातीलाच या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने रोपे काढून टाकावी लागतात. साहजिकच त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. विषाणू रोगाच्या नियंत्रणाचे थेट उपाय नसले तरी शिफारशीत तंत्रज्ञानाचा एकसंधपणे अवलंब केल्यास केळीवरील कुकुंबर मोझक विषाणू रोगाचे नियंत्रण करणे शक्य आहे.
कुकुंबर मोझॅक विषाणू रोगाची लक्षणेसुरूवातीस कोवळ्या पानांच्या शिरांतील हरितद्रव्य लोप पावते. त्यामुळे पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक तुटक किंवा संपूर्ण पानांवर आढळून येतात. कालांतराने पानांच्या शिरामधील भाग काळपट पडून तेथील ऊती मृत पावतात व पाने फाटतात. पानांचा पृष्ठभाग आकसतो व त्याच्या कडा वाकड्या होऊन पाने जवळ जवळ येतात. पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते रोगाच्या अती तीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पाने पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते.
कुकुंबर मोझॅक विषाणू रोगाचा प्रसारया विषाणू रोगाचा प्राथमिक प्रसार लागवड साहित्याद्वारे होतो. तर दुय्यम प्रसार मावा किडीद्वारे होतो. सीएमव्ही विषाणू रोगाचा दुय्यम प्रसार प्राथमिक प्रसारापेक्षा अधिक वेगाने होतो. म्हणून मावा किडीचे नियंत्रण या विषाणू रोगाच्या व्यवस्थापनात महत्वाचे ठरते. कुकुंबर मोझॅक विषाणू रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे केळीवरील कुकुंबर मोझॅक विषाणूरोग हा काही नवीन विषाणू रोग नाही.
सन १९४३ मध्ये जळगाव जिल्ह्यात या विषाणू रोगाची नोंद करण्यात आली. अर्थात केळी पिकावर येणाऱ्या विविध विषाणू रोगांपैकी या सीएमव्ही विषाणूरोग हा दुय्यम विषाणूरोग म्हणून गणला जायचा. मात्र अलिकडच्या काळात या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून आता तो प्रमुख विषाणूरोग म्हणून गणला जाऊ लागला आहे. सीएमव्ही विषाणू रोगाचा वाढता प्रादुर्भाव हवामान बदल हे एक महत्वाचे कारण असले तरी चूकीच्या पिक पध्दती आणि लागवडीच्या वेळा न पाळणे ही देखील महत्वाची कारणे आहेत.
अधिक वाचा: वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान
बदलत्या हवामानामुळे रस शोषणाऱ्या किडींच्या (जसे मावा) संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच जुलै ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे वाढलेली आर्द्रता आणि उष्ण दमट हवामान मावा किडींच्या वाढीस पोषक असते. त्यामुळेच जुलै ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे वाढलेली आर्द्रता आणि उष्ण-दमट हवामान, मावा किडीच्या वाढीस पोषक असते. त्यामुळेच जुलै-ऑगस्ट महिन्यात कुकुंबर मोझॅक विषाणूरोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
एक पिक पद्धती म्हणजे फक्त एकच पीक म्हणजे केळी पिक घेणे, लागवडीच्या वेळा न पाळणे, वर्षभर केळीची लागवड करणे आणि पिक फेरपालटीच्या अभाव हे देखील सीएमव्ही विषाणूरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची महत्वाची कारणे आहेत. कुकुंवर मोझॅक विषाणूरोगाचे ९०० पेक्षा जास्त पर्यायी यजमान पिके असून ही पिके केळी लागवडीच्या परिसरात घेतली जातात, यामध्ये तणांचा देखील समावेश होतो. सीएमव्ही रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावास हे देखील एक महत्वाचे कारण आहे.
रोगाचे व्यवस्थापन१) लागवडीच्या वेळा काटेकोरपणे पाळणे यासाठी लागवड जून, ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी महिन्यात करावी.२) कंदापासून लागवड करतांना ती निरोगी बागेतूनच निवडावीत.३) अलीकडच्या काळात ऊतीसंवर्धीत रोपांपासून केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊ लागली आहे. तंत्रज्ञान उत्कृष्ट असले तरी ऊतीसंवर्धीत रोपे खरेदी करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. साधारणतः ३० ते ४५ सेमी उंचीची, ४ ते ६ पाने असलेली आणि उत्तम दुय्यम कठीणता आणलेली रोपांची लागवड करावी.४) ऊतीसंवर्धीत रोपांची लागवड केल्यानंतर ती स्थिरावल्यावर आणि कंद लागवडीच्या रोपांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निबोंळी अर्क किंवा डायमेथोएट यांची आलटून पालटून फवारणी करावी.५) बागेत पावसाचे पाणी साचू देऊ नये.६) बाग आणि बागेचे बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावीत.७) केळी लागवड परिसरात काकडीवर्गीय पिके, टोमॅटो, मिरची, वांगी, चवळी, सोयाबीन, मूग, मटकी ही पिके आंतरपीक म्हणून घेऊ नये. तसेच सीएमव्ही विषाणू रोगाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही पिके केळी लागवडीच्या परिसरात देखील घेणे टाळावे.८) बागेत रोगाची लक्षणे दिसून आल्यास अशी रोपे त्वरीत उपटून जाळून नष्ट करावीत. ती बांधावर तशीच टाकू नयेत.९) मावा या वाहक किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा डायमेथोएट ३० ईसी २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारावे.१०) एक सारखे केळीचे पिक न घेता पिकांची फेरपालट करावी.११) कुकुंबर मोॉक विषाणूरोग हा विषाणूरोग असल्याने सामुहिक प्रयत्न महत्वाचे आहेत.
डॉ. चंद्रशेखर पुजारी, डॉ. गणेश देशमुख, डॉ. प्राजक्ता वाघअखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव