सद्यस्थितीत ढगाळ वातावरण व पावसाची उघडझाप यामुळे सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी, चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या (ऊंटअळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, पाने पोखरणारी अळी) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
असे करा व्यवस्थापन
- सापळा पिके
मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफुल या सापळा पिकाची एक ओळ लावावी आणि त्यावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यासहीत नष्ट करावीत. - कीडग्रस्त भाग/झाड काढून टाकणे कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
- अन्नद्रव्य व्यवस्थापन
पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्य योग्यवेळी द्यावे, यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन पीक किडीच्या प्रादुर्भावाला कमी बळी पडेल. रासायनिक खतांचा शिफारसीनुसार वापर करावा. नत्रयुक्त खताचा अतिरीक्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. - नियमित सर्वेक्षण
पिकाचे आणि किडीचे प्रत्यक्ष शेतांना नियमित भेटी देऊन निरीक्षण करावे. - तण व्यवस्थापन
शेताची कोळपणी व खुरपणी किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर करून तणांचे व्यवस्थापन करावे. - कामगंध सापळ्यांचा वापर
तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या सर्वेक्षणासाठी ५ सापळे आणि पतंगाना सामूहिकरित्या आकर्षित करण्यासाठी २० सापळे प्रति हेक्टरी लावावेत. हिरवी घाटे अळीच्या सर्वेक्षणाकरीता हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावेत. - पक्षी थांबे
पक्ष्यांना बसण्यासाठी २५ पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. त्यामुळे पक्षी त्यावर बसून शेतातील किडी टिपून खातील.