Join us

सोयाबीनवर प्रादुर्भाव करणारी खोड कीड व पाने गुंडाळणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 3:09 PM

ज्या भागात सोयाबीनची पेरणी जून महिन्यात झाली तेथे सोयाबीन पीक रोप अवस्थेत असून दोन ते तीन आठवड्यांचे झालेले आहे. कोरड्या वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोड माशी व पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ज्या भागात सोयाबीनची पेरणी जून महिन्यात झाली तेथे सोयाबीनपीक रोप अवस्थेत असून दोन ते तीन आठवड्यांचे झालेले आहे. कोरड्या वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोड माशी व पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

प्रादुर्भावाच्या प्राथमिक अवस्थेत या किडींचे व्यवस्थापन करणे हे सुदृढ पीक वाढीसाठी व त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असते. या किडींचे शास्त्रोक्त पद्धतीने नियंत्रण व व्यवस्थापन करण्याविषयी माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.

१) खोड माशीप्रादुर्भावाची लक्षणे- पानाच्या शिरांद्वारे या किडीची अळी सोयाबीनच्या खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते. - उगवणीपासून ७ ते १० दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येतो, त्यामुळे  प्रादुर्भाव ग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात.शेंड्यापासून जमीनीकडील दिशेने झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून  त्यांवर लालसर काळे ठिपके दिसू लागतात, तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो व रोपे वाळून मरून जातात. परिणामी शेतातील रोपांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते.पिकाच्या वाढीच्या नंतरच्या अवस्थेमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत परंतू, खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.

नियंत्रण/व्यवस्थापन- १० ते १५% प्रादुर्भावग्रस्त झाडे, ही या किडीची आर्थिक नुकसान पातळी आहे व नियंत्रणात्मक उपाययोजना करावी.सोयाबीनची पेरणी वेळेवर म्हणजे जून महिन्यात योग्य वापस्यावर केल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो.- पेरणीसाठी या किडीस प्रतिकारक्षम असणार्‍या वाणांची निवड करणे गरजेचे असते. पेरणीच्या वेळी थायमेथोक्झाम ३० एफ.एस. १० मिलि ची प्रती एक किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.पीक ७-१० दिवसांचे असताना किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच थायमेथोक्झाम २५% WG ७५ ग्रॅम प्रति हे. किंवा थायमेथोक्झाम १२.६०% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन ९.५०% झेड.सी. १२५ मिलि प्रति हे. ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे. 

२) पाने गुंडाळणारी अळीप्रादुर्भावाची लक्षणे- या किडीच्या अळ्या सुरवातीला पाने पोखरून त्यावर उपजीविका करतात. नंतर ही कीड एक किंवा अधिक पाने एकमेकांस जोडून पानाच्या सुरळीत राहून त्यातील हरितद्रव्यावर जगते. चिटकलेली पाने उघडून पाहील्यास आत अळी व तिची विष्ठा दिसते.परिणामत: प्रादुर्भाव झालेली काही पाने गळून पडतात. सोयाबीन पिकामध्ये गुंडाळलेली पाने दिसल्यास या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे ओळखावे व नियंत्रणात्मक उपाययोजना करावी.

नियंत्रण/व्यवस्थाप- या किडीच्या प्रदुर्भावाच्या सुरुवातीच्या कालावधी दरम्यान गुंडळी किंवा सुरळी झालेली पाने शेतात फिरून तोडून घेऊन, ती पाने शेताबाहेर जमिनीत पुरून टाकावीत किंवा योग्य उपाययोजना करून अळ्यांचा नायनाट करावा. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकावर क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ लि. प्रति हे. किंवा प्रोफेनोफॉस १ लि. प्रति हे. किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ एस.सी. ५०० मि.ली. प्रति हे. किंवा क्लोरांट्रॅनीलिप्रोल १८.५ एस.सी. १५० मि.ली. प्रति हे. यापैकी एका कीटकनाशकाचा ५०० लिट्रर पाण्यात मिसळून फवारणीसाठी आलटून पालटून वापर करावा.

एस. ए. जायभाय (शास्त्रज्ञ-ड) सुरेशा पी. जी. (शास्त्रज्ञ-ब)सोयाबीन सुधार योजना, आघारकर संशोधन संस्था, पुणे7588559910

टॅग्स :सोयाबीनकीड व रोग नियंत्रणशेतीशेतकरीपीकपाऊसहवामान