आंबा व वेलवर्गीय भाजीपाला पिकांत फळमाशी (फ्रूटफ्लाय) आढळल्याने युरोपने या शेतमालावर बंदी घातली आणि फळमाशी चर्चेत आली. ही फळमाशी जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाची व गंभीर कीड झाली आहे. सद्यस्थितीत आंबा पिकाचा हंगाम सुरू आहे.
सद्यस्थितीत आंबा फळांची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे तसेच मागून आलेला मोहोर त्यामुळे अजून पूर्ण फळ तयार झाली नाहीत अशावेळी आंबा पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी काही उपाययोजना खालीलप्रमाणे.
- आंबा फळांचे फळमाशी पासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळे मिळविण्यासाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या फळांना डॉ.बा.सा.कॉ.कृ. विद्यापीठाने दिलेल्या शिफारशी नुसार २५ x २० सें.मी. आकाराची कागदी/वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे.
- आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- आंबा फळांची गळ कमी करण्यासाठी तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी व प्रत सुधारण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना साधारणतः १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
- आंबा फळांची फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसातून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे.
- फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत आणि विद्यापीठाने शिफारस केलेले "रक्षक फळमाशी सापळा" प्रती एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावा.
- तयार आंबा फळांची काढणी देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला करावी.
- उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने फळांची काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ वाजल्यानंतर उन्हाची तीवता कमी झाल्यावर करावी.
- फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी.
- फळकूज ह्या काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी तसेच काढणी नंतर फळे पोटॅशियम मेटाबायसल्फाईट ०.०५ टक्के (०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी) या रसायनाच्या ५० अं. सें. उष्णजल द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत.