Join us

Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 3:05 PM

आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या अतिघन आंबा लागवड amba lagvad पद्धतीचे तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करू लागला आहे.

आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या अतिघन आंबा लागवड पद्धतीचे तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करू लागला आहे.

आंबा लागवडीसाठी महात्मा गांधी रोजगार हमीशी निगडित फळबाग लागवड कार्यक्रम व स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनांमधून शासनामार्फत अनुदान दिले जात आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी ई-सेवा केंद्रातून यासाठी अर्ज करू शकतात.

आंबा लागवडीसाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे योजनेमधून लागवड करताना १० बाय १० मीटर किंवा घन लागवड ५ बाय ५ मीटरवर लागवड करू शकतात. १० बाय १० मीटर लागवड केल्यास हेक्टरी १०० झाडे बसतात तर ५ बाय ५ मीटरवर लागवड केल्यास हेक्टरी ४०० झाडे बसतात. हवामान व जमीन विचारात घेता दोन ओळीतील अंतर १४ फूट व दोन झाडातील अंतर ८ फुटांपेक्षा कमी असू नये.

दोन ओळी १४ फूट अंतर ठेवल्यास आंतर मशागत फवारणी या गोष्टी ट्रॅक्टरनेही करणे शक्य होते. तसेच दोन झाडांतील अंतर ८ फुटांपेक्षा कमी केल्यास ३ ते ४ वर्षांत फांद्या एकमेकांत घुसतात व झाडे एकमेकांशी स्पर्धा करू लागल्याने उत्पादनावर याचा वाईट परिणाम होतो.

लागवडीसाठी केशर हीच जात जिल्ह्यातील वातावरणासाठी चांगली आहे. लागवड करताना दक्षिण-उत्तर दिशेने ८ ते ९ फूट तर पूर्व-पश्चिम १४ फूट या अंतरावर लागवड केल्यास एकरी साधारण ३८५ झाडे बसतात. आंबा पीक अनेक वर्षे शेतात राहणार असल्याने लागवडीसाठी एक बाय एक मीटरचा खड्डा घेणे चांगले.

तसेच १४ फुटांवर ओळी आखून जेसीबीच्या मदतीने मोठ्या बकेटने एक बाय एक मीटरची चर किंवा नाली तयार करून घ्यावी. नंतर नाली मुरूम व माती मिश्रणाने भरून घ्यावी. नाली भरताना जिथे आपण झाड लावणार आहोत, त्या प्रत्येक ठिकाणी दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा आणि दोन टोपले चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नाली भरताना एक ते दीड फुट गादीवाफा होईल, असे पाहावे.

कलमांची निवड करताना खात्रीशीर रोपवाटिकेतील कलमे घ्यावीत. त्यासाठी कलम काडी वापरलेल्या मातृवृक्षांची खात्री करावी. कमीत कमी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी कलमीकरण केलेले, दीड ते दोन फूट उंचीचे कलम लागवडीसाठी निवडावे. त्यामध्ये २५० ग्रॅम लिंबोळी पेंड, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम पीएबी व २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक मिसळून घ्यावे. त्यात कलम लागवड करावी.

खत व्यवस्थापनआंब्याच्या झाडाला सुरुवातीचे एक वर्ष ड्रिपमधून १९:१९:१९: हे खत द्यावे. सुरुवातीपासूनच कीड नियंत्रणासाठी बिव्हेरीया, व्हर्टिसिलीयम व मटारयझियम या बुरशींची वापर करावा. तर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा. जुन, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत दर १५ दिवसांनी या जैविक घटकांची फवारणी करावी. अत्यंत कमी किमतीत हे सर्व जैविक घटक कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथे उपलब्ध आहेत.

लागवडीनंतर कलमांची काय काळजी घ्यावी?• कलमांना दोन्ही बाजूला दोन काड्या रोवून त्यावर आडव्या काड्या बांधाव्यात, तयार झालेल्या शिडीसारख्या आधाराला कलम दोन ठिकाणी सैलसर बांधून घ्यावे.• कलमांना ठिबकद्वारे पाणी देताना कलमाच्या दोन्ही बाजूंनी पाणी मिळावे, यासाठी सुरुवातीला दोन ड्रिपर असावेत.• बागेचे भटक्या जनावरांपासून संरक्षणासाठी कुंपण असावे.• कमी उंचीची आंतरपिके घ्यावीत, मका आंतरपीक घेऊ नये.

अशी करा छाटणीअतिघन लागवड पध्दतीमध्ये फळ झाडांचा सांगाडा तयार करणे, तसेच झाडाचे घेर नियंत्रण हे महत्त्वाचे आहे. यावरच अतिघन लागवडीचे यश अवलंबून आहे. झाडांना आकार देण्यासाठी झाड एक मीटर उंचीपर्यंत वाढल्यानंतर त्याचा मुख्य शेंडा ७५ सेंटिमीटरला छाटणी करावी. त्यानंतर जोडावर येणाऱ्या तीनच फांद्या ठेवाव्यात. त्या तीन फांद्या ४५ सेमी अंतरावर छाटाव्यात. त्या फांद्यांच्या जोडावर येणाऱ्या दोन फांद्या ठेवाव्यात. त्या दोन फांद्या पुन्हा ३० सेमी अंतरावर छाटाव्यात. त्या फांद्याना जोडावर येणाऱ्या तीनच फांद्या ठेवाव्यात. म्हणजेच एक मुख्य खोड त्यावर तीन फांद्या, त्या तीन फांद्यांवर दोन-दोन फांद्या व त्या प्रत्येक फांदीवर पुन्हा तीन-तीन फांद्या ठेवाव्यात, याप्रमाणे छाटणी करावी.

मनोजकुमार वेताळ कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली

अधिक वाचा: Mango Varieties: आंबा लागवड करताय? कोणत्या जातीची निवड कराल

टॅग्स :आंबालागवड, मशागतपीकपीक व्यवस्थापनसरकारी योजनाफलोत्पादनफळेशेतकरीशेती