भारतातील सर्वच राज्यामध्ये आंब्याची लागवड केली जात असून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, बिहार, ओरिसा इत्यादी राज्य आंबा उत्पादनात प्रमुख राज्य म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रामध्ये ४.७४ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड असून त्यापैकी सर्वात जास्त लागवड कोकण विभागात आहे.
आंबा यशस्वी उत्पादनासाठी योग्य जातीची निवड ही पहिली व अत्यंत महत्वाची पायरी आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने आंब्यामध्ये आजपर्यंत एकूण सात जाती प्रसारित केल्या आहेत.
१) हापूस
- कोकण विभागात मोठ्या प्रमाणात होणारी व जगामध्ये जास्त मागणी असणारी जात असून या जातीच्या फळांच्या गोडी चव, स्वाद, रंग, आकार, टिकाऊपणा इत्यादी गुणांमुळे ती अधिक लोकप्रिय झाली आहे.
- हापूसची फळे मध्यम आकाराची आकर्षक पिवळसर रंगाची घट्ट, रेषाविरहीत शेंदरी रंगाचा गर असलेली जात आहे.
- फळांच्या अप्रतिम चव व उत्कृष्ट स्वादासाठी ही जात प्रसिध्द आहे. या जातीपासून सरासरी १५० ते २५० फळे प्रति झाड एवढे उत्पादन मिळते.
२) रत्ना
- विद्यापीठाने नीलम वा व हापूस या जातींच्या संकरणीकरणातून रत्ना ही जात सन १९८१ साली प्रसारित केली आहे.
- या जातीतील फळांमध्ये, हापूस जातीमध्ये आढळणारी साका ही विकृती आढळत नाही.
- प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी ही जात चांगली आहे.
- या जातीपासून सरासरी २५० ते ३०० फळे प्रति झाड एवढे उत्पादन मिळते.
३) सिंधू
- विद्यापीठाने रत्ना व हापूस यांच्या संकरीकरणातून ही जात सन १९९२ साली विकसीत केली आहे.
- ही झाडे सावकाश वाढतात व ठेंगणी राहतात.
- त्यामुळे भविष्यात घन लागवडीसाठी ही जात उपयुक्त ठरु शकेल.
- या जातीपासून सरासरी २०० ते २५० फळे प्रति झाड एवढे उत्पादन मिळते.
४) कोकण रुची
- नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून विद्यापीठाने ही जात सन १९९९ साली खास लोणच्यासाठी प्रसारीत केली आहे.
- नियमित फळधारण, मोठे फळ, गराचे जास्त प्रमाण, जाड साल, जास्त आम्लता व जास्त उत्पन्न या वैशिष्ट्यांमुळे खास लोणच्यासाठी प्रसारित केलेली भारतातील ही एकमेव जात आहे.
- या जातीपासून सरासरी २५० ते ३०० फळे प्रति झाड एवढे उत्पादन मिळते.
५) कोकण राजा
- हिमायुद्दीन व बँगलोरा यांच्या संकरीकरणातून विद्यापीठाने ही जात सन २०१० साली खास कच्ची खाण्याकरीता प्रसारीत केली आहे.
- नियमित फळधारण, मोठे फळ, गराचे जास्त प्रमाण व सॅलडकरीता योग्य जात अशी वैशिष्टपूर्ण गुणधर्म असलेलीही जात आहे.
- या जातीपासून सरासरी ११० ते १२० फळे प्रति झाड एवढे उत्पादन मिळते.
६) सुवर्णा
- हापूस व निलम यांच्या संकरीकरणातून विद्यापीठाने ही जात सन २००९ साली ही जात प्रसारीत केली आहे.
- नियमित फळधारण, घोसामध्ये फळे, साकाविरहीत फळे तसेच तंतूविरहीत व कापून खाण्यासाठी योग्य असलेली ही जात आहे.
- या जातीपासून सरासरी २५० फळे प्रति झाड एवढे उत्पादन मिळते.
७) कोकण सम्राट
- हापूस व टामी अॅटकिन्स यांच्या संकरीकरणातून विद्यापीठाने ही जात सन २०१४ साली ही जात प्रसारीत केली आहे.
- विदेशी जातीशी संकर करून तयार करण्यात आलेली ही पहिलीच जात आहे.
- प्रतिवर्षी फळधारण, घोसामध्ये फळे, साकाविरहीत तसेच तंतूविरहीत फळे व कापून खाण्यासाठी योग्य व गराचे तसेच एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण अधिक असलेली ही जात आहे.
- या जातीपासून सरासरी २५० ते ३०० फळे प्रति झाड एवढे उत्पादन मिळते.
या व्यतिरिक्त केशर, पायरी, तोतापुरी, नीलम, दशहरी, आम्रपाली या देशी तसेच टॉमी अॅटकिन्स, माया, लिली, ऑस्टीन, हेडन, केंट, किट इत्यादी आंब्याच्या महत्वाच्या परदेशी जाती आहेत.
अधिक वाचा: Neem Ark शेतकऱ्यांनो आताच करा निंबोळ्या गोळा, निंबोळी अर्कासाठी होईल याचा फायदा