Nashik : फळ, भाजीपाला, धान्य पिकविण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशक फवारणीचे प्रमाण वाढले आहे. दूध वाढण्यासाठी म्हैस अन् गायींना धोकेदायक इंजेक्शन दिले जात आहे. हा सर्व प्रकार पाहिला तर प्रत्येकाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसते. याच विचारातून नाशिक जिल्ह्यात आता सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड वाढली असून विषमुक्त शेतीकडे कल आहे.
राज्य शासनाने 'डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन' योजनेस नुकतीच मुदतवाढ दिली आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 500 हेक्टरवर सेंद्रिय शेतीची लागवड दरवर्षी अपेक्षित असते. त्यातील 90 टक्के उद्दिष्ट पूर्ण होते. सेंद्रिय भाजीपाल्यास बाजारात चांगली मागणी आहे. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताचा वापर शेतकरी भाजीपाला पिकासाठी करत आहेत. त्यामुळे उत्पादन व दर्जा चांगला मिळतो. रासायनिक खतांचा वापर मोजकेच शेतकरी करीत असले तरी भाजीपाला पिकावर कीटकनाशक फवारणी मात्र कोणतेच शेतकरी करत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीनेच भाजीपाला उत्पादन घेत आहेत.
साधारण ३० लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय भाजीपाला लागवडीसाठी स्वतंत्रपणे अनुदान मिळत नाही. म्हणजे लागवड केलेल्या भाजीपाल्यात काही प्रमाणात सेंद्रिय शेती केली तर त्याला अनुदान नाही, मात्र 'डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन' योजनेसाठी शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी अर्ज करू शकते. साधारण 30 लाखांपर्यंतचे अनुदान तीन वर्षांसाठी सेंद्रिय शेतीसाठी या योजनेंतर्गत मिळेल.
सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी लाभदायी
रासायनिक खते, कीटकनाशकांचे अवशेष भाजीपाल्यात उतरत असल्याने सेंद्रिय भाजीपाला आरोग्यासाठी उपयुक्त असून लाभदायी आहे. जिल्ह्यात सध्या 500 हून अधिक हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. तर 275 हून अधिक हेक्टरमध्ये हिरवी मिरची लागवड करण्यात आली आहे. सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणारे हजारांपेक्षा अधिक शेतकरी आहे. तर यावर जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे म्हणाले की, सेंद्रिय भाजीपाला आणि शेतमालासाठी बाजारात चांगली मागणी आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजल्याने अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. जिल्ह्यातील काही गावातूनही 100 टक्के सेंद्रिय शेतीवर भर देण्यात आला आहे.