Join us

soil erosion जमिनीची धूप थांबविण्यासाठीचे उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 3:16 PM

जमिनीची धूप, झीज वा नुकसान यांना लगाम घातला न गेल्यास त्या माणसाला दारिद्रयाकडे नेतील आणि देशाच्या उत्पादनावर आणि संबधिताच्या आर्थिक परिस्थितीवरही त्याचे दुरगामी परिणाम होतील. जमिनीची धूप थांबविण्यासाठीचे काय उपाययोजना कराव्या या विषयी माहिती पाहणार आहोत.

जमिनीची धूप, झीज ही एक नैसर्गिक भुगर्भ शास्त्रीय क्रिया असून ती सतत चालू असते व ती कमी करणे मानवाच्या हातात आहे. मनुष्य जातीच्या असाधारण क्रियांमुळे केली जाणारी जमिनीची नासधुस ही सर्वात जास्त विशेष काळजी निर्माण करते. म्हणून मनुष्य स्वत:च त्याचे नियंत्रण करू शकेल. जमिनीची धूप, झीज वा नुकसान यांना लगाम घातला न गेल्यास त्या माणसाला दारिद्रयाकडे नेतील आणि देशाच्या उत्पादनावर आणि संबधिताच्या आर्थिक परिस्थितीवरही त्याचे दुरगामी परिणाम होतील. जमिनीची धूप थांबविण्यासाठीचे काय उपाययोजना कराव्या या विषयी माहिती पाहणार आहोत.

अ. मशागतीच्या पध्दतीमशागतीच्या तंत्राचा अवलंब करून जमिनीची धूप कमी करण्याच्या पध्दती खालीलप्रमाणे.१) पडीत जमिनीत गवताची राने किंवा जंगले तयार करावीत. अशा जमिनीवर कायम स्वरूपाची झाडे लावावीत.२) सखल जमिनीत आणि घळीमध्ये अंजन, ब्ल्यू पॅनिक, मारवेलसारखे गवत लावावे३) पिकांच्या ओळी उताराला समांतर न ठेवता, उताराला आडव्या ठेवाव्यात.४) समपातळीत मशागत करावी.५) पिकाच्या फेरपालटाने जमिनीच धूप कमी करता येते. त्यासाठी आंतरपिक व पट्टा पीक पद्धतीचा अवलंब करावा.६) जमीन नेहमी पिकाखाली ठेवावी. त्यामुळे पावसाचे पाण्यामुळे होणारी धूप थांबते.७) वाऱ्याला व पाण्यास विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर गवताचे जैविक बांध घालावेत.

ब. यांत्रिक पध्दती

१) समपातळीत बांध (कंटूर बंडिंग)कमी खोलीच्या (५० सें.मी. पर्यंत) जमिनीत समपातळीत बांध घालतात. दोन बांधामधील अंतर ६० ते ८० मीटर असते. उतार १ ते ३ टक्केपर्यंत असतो. या बांधाना समपातळीपेक्षा १ फुट उंचीवर सांडी काढतात. दोन बांधामधील पाणी आडले जावून बांधाजवळ वाहून आलेला गाळ खालच्या बांधाच्या आतील बाजूस सारखा साचतो. पाण्यामुळे माती शेतातून वाहून न जाता शेतातच राहते. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. जमिनीची सुपिकता टिकून राहते. भरपूर ओलावा राहतो. पिकांची वाढ चांगली होते. विहिरीतील आणि भुगर्भातील पाण्याचा साठा वाढतो.

अधिक वाचा: soil erosion जमिनीची धूप होण्याची कारणे कोणती?

२) नाला बांधबंदिस्ती (नाला बंडिग)जमिनीला जास्त उतार असला म्हणजे फार मोठया घळी पडतात. या घळींना आडवे बांध घालून पाणी आडविले नाही तर सतत जमिनीची धूप होत राहते आणि घळी अधिक रुंद होतात. म्हणून घळी किंवा नाल्याला आडवे बांध घालावेत. हे बांध मातीचे किंवा दगडाचे असावेत. गोल दगडी बांधामुळे पाण्याबरोबर वाहून आलेली माती बांधाच्या आत साठून राहते. दगडातून पाणी जाते. तसेच सतत गाळ साचून नवीन सुपीक जमीन तयार होते. नाल्याला बांध घातल्यामुळे बांधाच्या खालच्या भागातील विहिरींचे पाणी वाढते.

३) ढाळीचे बांध (ग्रेडेड बंडिग) ज्या जमिनीची खोली ५० सेंमी पेक्षा जास्त असते. अशा जमिनीत ढाळीचे बांध घालतात. जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेतीची बांधबंदिस्ती वेगळ्याप्रकारे करावी लागते. त्याना ग्रेडेड बंडिग म्हणतात. या पध्दतीत उतारानुसार दोन बांधामधील अंतर ४० ते ११० मीटर ठेवतात. बांधाना शेवटी दगडाची सांड घालून नालीवाटे पाणी बाहेर काढून दिले जाते. ढाळीचे बांध घालताना, बांधाच्या वरच्या बाजूने १० मी लांब x २.३ मी रूंद आणि २० ते ३० सेंमी खोल असे खड्डे घेऊन त्याची माती ढाळीचे बांधासाठी वापरावयाची व अशा दोन खड्डयामध्ये १ मीटर जागा न खोदता तशीच सोडून पुढे दुसरा खड्डा ढाळीचे बांधासाठी घेतल्यास, पावसाचे शेतातून वाहून आलेले पाणी प्रथम खड्डयात साचते. जमिनीचे फुल अशा खड्डयामध्ये साचून राहते व फक्त अतिरिक्त पाणी ढाळीच्या बांधाच्या बाजूनें पुढे सरकते. यासच कॉन्झरवेशन पीट ग्रेडेड बंड (CPGB) असे नाव देण्यात आले आहे. कमी पाऊस पडल्यास सर्व अपधाव खड्डयात साठविली जाते आणि जास्त पाऊस पडल्यास अपधाव मातीची धूप कांही प्रमाणात रोखून बाहेर काढली जाते. अशाप्रकारच्या ढाळीच्या बांधाचा उपयोग भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी होतो.

४) खाचरे तयार करणे (टेरेसिंग)डोंगराच्या व टेकडयांच्या उतरणीवरील जमिनीस शक्य तेथे ओटे पाडून तिचे उपजाऊ जमिनीत रूपांतर करता येते. अशी उतरण विस्तीर्ण अशा भल्या मोठया पायऱ्यावर दिसू लागते. भातखाचरे अशाप्रकारे तयार होतात. विशेषत: ही पध्दती जास्त पावसाच्या प्रदेशात जिथे डोंगराचे उतार तीव्र (१० % च्या पुढे) असतात अशा ठिकाणी ही पध्दती फार उपयुक्त आहे.

५) पट्टा पेरणी (स्ट्रिप सोईंग)पिकांची लागवड योग्य पध्दतीने समपातळीत केल्यास जमिनीची धूप थांबविता येते अथवा कमी करता येते. पिकाच्या ओळी नेहमी उतारास आडव्या तसेच समपातळीत ठेवाव्यात. त्याचप्रमाणे नांगरणी, कुळवणी, कोळपणीदेखील उतारास आडवी करावी. भुईमूग, हुलगा, मटकी इत्यादी भुईसपाट वाढणाऱ्या धूपप्रतीबांध पिकांमुळे धूप कमी होते. उलट ज्वारी, बाजरी या धूपसुलभ पिकांमुळे जमिनीची धूप अधिक होते. म्हणून ही दोन प्रकारची पिके आलटून पालटून पट्यांनी पेरावीत. यालाच पट्टा पेरणी असे म्हणतात. जमिनीचा उतार ३२ मीटरला ३० सेंटीमीटर असल्यास धुपप्रतिबंधक पिकाच्या पट्टयाची रूंदी ७.५ मीटर आणि धुपसूलभ पिकाच्या पट्टयांची रूंदी २२.५ मीटर ठेवावी. सर्वसाधारणपणे धुपप्रतिबंध पिकाचा पट्टा आणि धुपसूलभ पिकाचा पट्टा याचे प्रमाण १:३ असे ठेवावे.

६) समपातळीवरील मशागत (कंटूर कल्टिवेशन)नांगरणी, कोळपणी, पेरणी वगैरे मशागत उतारास आडवी परंतू समपातळीत करतात. या पध्दतीच्या मशागतीत नांगराचा अथवा कुळवाचा प्रत्येक तास पाण्यास अटकाव निर्माण करतो. त्यामुळे पाण्याला माती वाहून नेण्याइतका वेग येत नाही व पावसाचे पाणी समपातळीत शेतात विभागले गेल्यामुळे, शेतात सगळीकडे सारखे पाणी मुरविले जाते.

) जैविक बांधया पद्धतीत समपातळी रेषेत उतारानुसार ठराविक अंतरावर गवताची लागवड करावी. त्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या मद्रास अंजन, मारवेल, मोळ, थिमिडा, नीलगवत इत्यादी गवताचा वापर करावा. या पद्धतीमध्ये अपधावाची गती जैविक बांधाजवळ कमी होते. त्यामुळे एक प्रकारची नैसर्गिक गाळणी तयार होऊन अपधावासोबत वाहून आलेले मातीचे कण अडविले जातात व धुपेचे प्रमाण कमी होऊन जमिनीत ओलावा वाढतो.

) अर्धवर्तुळाकार वरंबाही पद्धत जास्त उताराच्या व उथळ जमिनीमध्ये फळबागांसाठी विशेष उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये झाडाच्या आजूबाजूची माती ओढून उताराला आडवा अर्धवर्तुळाकार वरंबा झाडाच्या बुंध्यापासून खालच्या बाजूस १ ते २ मीटर अंतरावर तयार करावा. या वरंब्यामुळे पावसाचे पाणी वरंब्याच्या उंचीपर्यंत अडविले जाऊन हळुहळू जागेवरच जमिनीत मुरते. त्याचा झाडांच्या वाढीस चांगला उपयोग होतो.

अधिक वाचा: soil erosion जमिनीची धुप होण्याचे विविध प्रकार त्यामुळे होणारे दुष्परिणाम

१०)आच्छादनेपीक लागवडीत आच्छादनांचा उपयोग केला तर पीक लहान असताना पावसामुळे होणाऱ्या धुपेपासून जमिनीचे संरक्षण होते. त्याचप्रमाणे बाष्पीभवनाने वातावरणात जाणारे पाणी रोखले जाऊन जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकवून ठेवण्यास मदत होते व पिकांवरील पाण्याचा ताण कमी होतो. आच्छादनासाठी गव्हाचा भुसा, धसकटे, उसाचे पाचट, टाकाऊ कडबा, पालापाचोळा व प्लॅस्टिक पेपर इत्यादीचा वापर करता येईल. खरीप, रब्बी व उन्हाळी तीनही हंगामात आच्छादनांचा उपयोग करावा.

११) ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतातील माती संपूर्ण वाहून गेलेल्या शेतात तळ्यातील गाळ आणून टाकावा. जमिनीत सेंद्रिय भूसुधारकांचा मळीकपोष्ट, कंपोस्ट, प्रॉम ई. वापर करावा तसेच हिरवळीची पीक गाडावीत आणी बांधबंदिस्ती करावी.

वरील सर्व उपाययोजना शेतातून वाहणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी शेततळी तयार करावीत. शेततळ्यांमध्ये साठलेल्या पाण्याचा उपयोग-संरक्षित सिंचनासाठी करता येईल. त्याचप्रमाणे पूर्वी केलेल्या बांध बंदिस्तीची फूट-तूट झाली असल्यास त्याची दुरुस्ती करून घ्यावी. त्यामुळे नंतर होणारे नुकसान टाळता येईल. वर नमूद केलेल्या सर्व उपचारपद्धतीचा उपयोग धूप थाबाविण्यासाठी व शेतावर मुलस्थानी पाणी जिरविण्यासाठी होतो. तरी पाणलोट क्षेत्रातील गावनिहाय शेतकरीबंधूनी श्रमदानातून, शासनाच्या मदतीने तसेच सामाजिक संस्थाच्या मदतीने वरील उल्लेख केलेल्या उप्यायोजानाचा वापर केल्यास माती व पाणी या नेसर्गिक संस्थानांचे संवर्धन होवून गावे पाणीदार सुजलाम सुफलाम होतील.

डॉ अनिल दुरगुडेमृदशास्त्रज्ञ, मृदविज्ञान विभाग, म.फु.कृ. वि. राहुरीडॉ. संतोष काळेशास्त्रज्ञ, अर्ध शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था, हैदराबाद

टॅग्स :शेतकरीपीकपाऊसशेती