Join us

Mohari Lagwad : मसाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या मोहरी पिकाची लागवड कशी करावी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:29 AM

रब्बी हंगामात उत्तम निचऱ्याच्या तसेच मध्यम काळ्या जमिनीवर मोहरीचे पीक घेता येते. योग्य ओलावा असताना जमीन आडवी-उभी नांगरावी. ढेकळे फोडून बारीक करावी व फळीने जमीन सपाट करावी.

रब्बी हंगामात उत्तम निचऱ्याच्या तसेच मध्यम काळ्या जमिनीवर मोहरीचे पीक घेता येते. योग्य ओलावा असताना जमीन आडवी-उभी नांगरावी. ढेकळे फोडून बारीक करावी व फळीने जमीन सपाट करावी.

मोहरीचे वाण व बियाणे प्रमाणमोहरीची लागवड करताना वरूणा व पुसा बोल्ड या जातीची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डॅझिम किवा थायरम किवा कॅप्टॉन बुरशीनाशक प्रतिकिलो ग्रॅम बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे. रोपांची संख्या योग्य ठेवण्यासाठी हेक्टरी पाच किलो बियाणे वापरावे.

पेरणी कशी कराल? पेरणी ओळीत ३० सेंटिमीटर किवा ४५ सेंटिमीटर व दोन रोपांत १० सेंटिमीटर अंतरावर २ ते ३ सेंटिमीटर खोल करावी. दि. १५ नोव्हेंबर ते दि. १५ डिसेंबरपर्यंत करावी.

आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापनपेरणीनंतर १० ते १२ दिवसांपर्यंत एक विरळणी करून २० दिवसांनी १ कोळपणी व ३० दिवसांनी खुरपणी करावी. हेक्टरी ९० किलो नत्र, ४५ किलो स्फुरद द्यावे. यापैकी ५० टक्के नत्राचा व १०० टक्के स्फुरदचा हप्ता पेरणीवेळी उरवलेले ५० टक्के नत्र पेरणीनंतर एका महिन्याने द्यावे. हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याच्या ४ ते ५ पाळ्या द्याव्यात.

पिक संरक्षणमोहरीवर भुरी व पांढरा तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. भुरी या रोगाची लक्षणे पाने, फांद्या आणि शेंगावर आढळतात. रोगग्रस्त भागांवर भुकटीचा थर साचल्यासारखी भुरकट पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. रोगग्रस्त भागाची कालांतराने मर होऊन तो भाग तपकिरी रंगाचा होऊन जातो. रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात विद्राव्य गंधक ०. २ टक्के या बुरशीनाशकाची अथवा ०.१ टक्का हेक्झकोनॅझोल या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी. नंतरच्या फवारण्या रोगाची तीव्रता बघून दर १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. कोकणात मोहरीची लागवड १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत केल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प होतो.

पांढरा तांबेरामोहरीच्या पिकावर भुरी या रोगासह 'पांढरा तांबेरा' या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या बुरशीची वाढ पानांच्या पृष्ठभागावर होते. रोगग्रस्त पानांवर सुरुवातीला पांढरट रंगाची पुरळासारखी वाढ होते. काही पुरळ एकत्र मिसळून मोठे पुरळ तयार होतात व पाने गळतात, रोग टाळण्यासाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात लागवड करावी. गरजेनुसार बोर्डो मिश्रणाची एखादी फवारणी करावी.

काढणी व्यवस्थापनसाधारणपणे मोहरी हे पीक ९० ते १०० दिवसांत तयार होते. पिकाच्या ९० टक्के शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी. कापलेले पीक २ ते ३ दिवस उन्हात वाळवावे. त्यानंतर काठीने झोडणी करावी व उफणणी करून काडीकचरा व दाणे वेगळे करावेत. या पिकापासून हेक्टरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.

टॅग्स :शेतीपीकपेरणीलागवड, मशागतपीक व्यवस्थापनसेंद्रिय खतकाढणी