Join us

मातीतूनही कमावता येतो पैसा; मातीच्या भांड्यांना पुन्हा येताहेत सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:29 AM

मातीच्या भांड्यांमध्ये अन्नातील पोषक तत्त्वे नष्ट होत नाहीत, त्याऐवजी अॅल्युमिनिअम किंवा स्टीलची भांडी वापरल्यास अन्न शिजवताना त्यातील अनेक पोषक तत्त्वे नष्ट होतात. मातीच्या भांड्यात अन्नामध्ये असलेले सर्व पोषक तत्त्व योग्य प्रमाणात राहतात.

पाली : वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा अतिरिक्त वापर यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशावेळी अन्न शिजविण्यासाठी पुन्हा एकदा मातीच्या भांड्यांचा वापर होताना दिसत आहे. परिणामी अन्नाची चव आणि पोषण तत्त्व टिकून राहत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा विविध प्रकारची मातीची भांडी मिळत आहेत. त्यामुळे कुंभारकाम व्यवसायाला व कारागिरांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.

पालीतील कुंभार व्यावसायिक नारायण बिरवाडकर यांनी मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे आणि त्याचे फायदे सांगितले. ते म्हणाले की, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची चव, पौष्टिकता व सुगंध अधिक वाढतो. परिणामी सध्या अनेक लोक मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे पसंत करत आहेत. यामुळे मातीच्या भांड्यांना खूप मागणी आहे. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला होतो, असे बिरवाडकर म्हणाले. मातीची भांडी व कुंभारकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

मातीच्या भांड्यांमध्ये अन्नातील पोषक तत्त्वे नष्ट होत नाहीत, त्याऐवजी अॅल्युमिनिअम किंवा स्टीलची भांडी वापरल्यास अन्न शिजवताना त्यातील अनेक पोषक तत्त्वे नष्ट होतात. मातीच्या भांड्यात अन्नामध्ये असलेले सर्व पोषक तत्त्व योग्य प्रमाणात राहतात. मातीची भांडी निसर्गात क्षारीय असल्याने, ते अन्नातील आम्लतेशी संवाद साधतात, त्यामुळे पीएच संतुलन करते आणि ते निरोगी बनवते. बऱ्यापैकी आदिवासी शेतकरी आपले अन्न मातीच्या भांड्यात बनवत असतात.

मातीच्या भांड्यांत अन्न शिजवण्याचे फायदेमातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची चव अप्रतिम असते. अन्नाला एक वेगळ्या प्रकारचा गोड वास असतो. मातीच्या भांड्यात शिजवून अन्नामध्ये सर्व पोषक तत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्यामुळे पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. मातीची भांडी लवकर गरम होतात, त्यामुळे अन्न शिजवताना इंधन कमी लागते. शिवाय तेल देखील कमी लागते.

पूर्वी फक्त मातीचे माठ अधिक विक्री होत होते. पण, आता मातीच्या भांड्यांचे महत्त्व कळू लागल्याने लोक मातीची विविध भांडी वापरत आहेत. हॉटेल व्यावसायिक देखील मातीच्या भांड्यांतील वेगवेगळे अन्नपदार्थ विक्री करत आहेत. परिणामी कुंभारकाम व्यवसायाला उभारी मिळाली आहे. मात्र, परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्पर्धा वाढली आहे. - कल्पना कुंभार, व्यावसायिक, पाली

टॅग्स :अन्नआरोग्यशेतकरी