महाराष्ट्राची मोसंबी देशात सर्वदूर परिचित आहे. महाराष्ट्रात साधारणता ८५,००० हेक्टर क्षेत्र असून ४५,००० हेक्टर क्षेत्रातील मोसंबी पिक उत्पादन देत आहे. आपली उत्पादकता अतिशय कमी आहे (१० ते १२ टन/हेक्टर) या उलट प्रगत देशाची उत्पादकता ही २५ टन/हेक्टर पर्यंत आहे.
उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य बहार व्यवस्थापन, बागेची योग्य मशागत करणे व एकात्मिक खत व्यवस्थापनाचा योग्य वापर तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
बहार कसा धरावा?
उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ सतत चालू राहते. ह्यामुळे सतत फुले येतात. फुलधारणा भरपूर होत नाही. फुलधारणा होण्यापूर्वी मोसंबीच्या झाडांना विश्रांतीची आवश्यकता असते. ही विश्रांती नैसर्गिकरीत्या मिळत नसल्याने कृत्रिमरीत्या बहार धरण्याची प्रक्रिया करावी लागते. आपल्याकडे हिवाळ्यात तापमान कमी होत असल्याने झाडांची वाढ थांबते आणि मोसंबीची झाडे सुप्त अवस्थेत जातात. म्हणजेच झाडांना विश्रांती (ताण) मिळते. तापमानात वाढ झाल्यावर पुन्हा पालवी फुटण्यासाठी बहार येतो.
मोसंबीच्या झाडांना ताण दिला नाही आणि त्यांची वाढ अनियंत्रित ठेवली तर खालील दुष्परिणाम दिसून येतात.
१) मोसंबीच्या झाडास वर्षभर सतत फुले येतात.
२) एका बहराची फुले झाडावर असताना दुसऱ्या बहराची फुले कमी लागतात.
३) झाडावर येणाऱ्या सततच्या फुलाफळामुळे झाडावर परिणाम होतो व झाड कमकुवत बनते.
४) कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
५) मोसंबीच्या फळाची प्रत चांगली राहत नाही.
६) राखण आणि इतर खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढतो.
ताणाचा कालावधी
भारी पण उत्तम निचऱ्याची जमीनीमध्ये ताणाचा कालावधी पाऊसमानानुसार आणि वेगवेगळ्या हवामानात कमी अधिक होऊ शकतो. पाणी देताना अथवा पाणी तोडताना पाणी टप्याटप्याने जास्त अथवा कमी करावे. पाणी सुरु करण्यापूर्वी आळे करून शिफारशीप्रमाणे खते द्यावीत. जमिनीच्या प्रकारानुसार ताण देण्याचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.
जमिनीचा प्रकार - ताण देण्याचा कालावधी (दिवस)
हलकी - ३५ ते ४५
मध्यम - ४५ ते ६०
भारी - ५५ ते ७५
मोसंबी आंबे बहराचा ताण देण्याचा अन फुले येण्याचा आणि फळ काढणीचा काळ, बहराची वैशिष्ट खालीलप्रमाणे आहे.
बहार | ताण देण्याचा काळ | फुले येण्याचा काळ | काढणीचा काळ | बहाराची वैशिष्टे |
आंबे बहार | नोव्हेंबर-डिसेंबर | जानेवारी-फेब्रुवारी | सप्टेंबर-ऑक्टोबर | बहार खात्रीचा असतो. फळाचा रंग आकर्षक. प्रत चांगली राहते. भाव चांगला मिळतो. फळ वजनाने जास्त. बागेचे आयुष्य वाढते. फळमाशीचा उपद्रव जास्त. |
ताण देताना घ्यावयाची काळजी
१) जास्तीचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
२) ताण देताना हळू हळू पाणी कमी करत जावे व ताण सोडताना हळू हळू पाणी वाढवीत जावे.
३) अंतरमशागत करताना खोडाला व मुळाना इजाहोणार नाही याची काळजी घ्यावी.
४) ताण ताडण्यापुर्वी झाडावरील वाळलेल्या काड्या काढून खोडास बोर्डोपेस्ट लावावे.
५) बाग ताणावर असताना झाडावर मागील हंगामाची फळे नसावीत.
- डॉ. संजय पाटील
प्रभारी अधिकारी
मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर
९८२२०७१८५४
अधिक वाचा: जुन्या आंबा बागेचे उत्पादन वाढविण्यासाठी कोंकण कृषि विद्यापीठाचा महत्वाचा सल्ला