Join us

अळंबी लागवड ठरतेय उत्पन्नाचे चांगले साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 10:26 AM

अळंबीची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते मात्र बटण अळंबी, शिटाके अळंबी, भाताच्या पेंढ्यावर वाढणारी अळंबी, धिंगरी अळंबी या चार जाती जागतिक उत्पादनात अग्रेसर आहेत.

अळंबीची लागवड अनेक देशांमध्ये केली जाते मात्र बटण अळंबी, शिटाके अळंबी, भाताच्या पेंढ्यावर वाढणारी अळंबी, धिंगरी अळंबी या चार जाती जागतिक उत्पादनात अग्रेसर आहेत. यापैकी बटण व शिटाके या जाती थंड तापमानात (१६-१७ अंश सेल्सियस) वाढणाऱ्या आहेत. २० ते ४० सेल्सियस तापमानात वाढणाऱ्या अळंबी आहेत. अळंबीच्या जातीनुसार तिच्या वाढीसाठी लागणारे माध्यम वेगवेगळे असते. बटण अळंबी विशिष्ट प्रकारच्या कंपोस्टवर वाढते, शिटाके अळंबी विशिष्ट झाडांच्या भुशावर वाढते. भाताच्या पेंढ्यावर वाढणारी अळंबी भाताचा पेंढा, गव्हाचे काड कापसाची पराटी यासारख्या माध्यमांवर तर धिंगरी अळंबी भाताचा पेंढा, गव्हाचे काड, भुईमुगाची टरफले, केळीची पाने व सोप, उसाचे चिपाड यासारख्या अनेक माध्यमांवर वाढते.

तापमान व माध्यमांचा विचार करता, अळंबीच्या सर्व जातींमध्ये धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी विशिष्ट तापमानाची अथवा माध्यमांची आवश्यकता नसते. यामुळेच कमीत कमी भांडवली खर्चात या अळंबीची लागवड करता येते. धिंगरी अळंबीच्या ३५ प्रजाती व्यापारी तत्त्वावरील लागवडीसाठी उपयुक्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्ल्युरोटस साजोरकाजू, प्ल्यु फ्लोरिडा, प्ल्यु ऑस्ट्रीएसटस्, प्ल्यु समीडस, प्ल्यु. यामोर (प्ल्य् इओस) प्ल्यु. फोस्स्युलॅटस या प्रजातींचा समावेश आहे. इतर जातींच्या तुलनेत या अळंबीच्या लागवडीची पद्धत अत्यंत सोपी असल्याने अळंबीची लागवड सहजपणे करता येते.

धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देणाऱ्या निवाऱ्याची गरज असते. मातीच्या विटा रचून बनविलेली अथवा पक्के बांधकाम केलेली खोली किंवा बांबूच्या भिंतीची खोली किंवा नारळ सुपारींच्या झावळांनी बंदिस्त केलेल्या आणि शाकारलेल्या झोपडीतही या अळंबीची लागवड करण्यात येते. अनेक माध्यमांवर ही अळंबी वाढत असली तरी भाताचा पेंढा किंवा गव्हाच्या काडावर या अळंबीचे उत्पादन इतर माध्यमांपेक्षा जास्त येत असल्याने या दोन्हीपैकी एक माध्यम लागवडीसाठी वापरावे. लागवडीसाठी वापरावयाचा पेंढा किंवा काड नवीन हंगामातील व व्यवस्थित वाळलेला असावा. माध्यम जुने/रोगट असल्यास अळंबी वाढीवर विपरीत परिणाम होत उत्पादनात घट येते. अळंबी लागवडीसाठी शुद्ध बियाणे वापरावे.

अळंबी लागवड पद्धत अळंबीगृहात लागवड करण्यापूर्वीत्या जागेत असलेल्या हानिकारक बुरशीचा आणि किडीचा नायनाट करणे गरजेचे आहे. यासाठी कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची (१ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यात) आणि मेलॉथियॉन (१ मिली प्रति १ लिटर पाण्यात फवारणी करावी. लागवडीसाठी वापरावयाचा पेंढा/काडाचे २-३ इंच लांबीचे बारीक तुकडे करून ते एका पोत्यात भरून थंड पाण्यात ८ ते १० तपास भिजत ठेवावे. नंतर पोते पाण्याबाहेर काढून जादा पाण्याचा निचरा करावा. पेंढ्यावर/काडावर वाढणाऱ्या बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

टॅग्स :शेतीशेतकरीपीक