अस्मानी व सुलतानी संकटात असलेल्या भारतीय शेती व शेतकरी तसेच उच्चशिक्षित शेतकरी तरुणांचा शेतीकडे बदललेला नकारात्मक दृष्टीकोन, ग्राहक व शेतकरी यांचं न होणार समाधान आणि रोजच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असलेल्या अन्न उत्पादनासाठी रसायन व केमिकलचा अतिवापर व असंमजसपणा असे सध्याचे वास्तव. त्यात शुद्ध, सकस अन्न मिळावे ही सामान्यांची रास्त अपेक्षा कशी नाकारता येणार?
बऱ्याच देशांनी काही रसायने बंद केली आहे किंवा ते अशा प्रकारचा शेतमाल घेत नाही रेसिड्यु ( ऊर्वरीत अंश) चेक केल्याशिवाय ते कोणताही शेतमाल विकत घेत नाही. परंतु दुर्दैवाने भारतात मात्र असे काहीही नाही. म्हणूनच सर्रास केमिकल्सचा अतिवापर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे असे केमीकल वापरलेला शेतमाल शेतकरीच आधी सेवन करतो व आपल्या परिवारास देतो. मग इतरांना विकतो. ही अतिकेमिकल वापराची पद्धत प्रथम बंद व्हायला हवी, तशी राजकीय व सर्वांचीच समज व्हायला हवी यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवा.
मूल्य साखळीचा अभाव
आपल्याकडे मोठी विचित्र परिस्थिती सद्य:स्थितीत आहे एकीकडे ग्राहक महागाईने ओरडतो, तर दुसरीकडे शेतकरी बाजार भाव नसल्याचे तक्रारी करतो दोन्हीही बाजूंनी प्रश्न आहे. तिसरीकडे अजून एक मोठा वर्ग असा आहे, त्याला शाश्वत आणि केमिकल विरहित प्रोडूस केलेला शेतमाल व अन्नधान्य फळे भाजीपाला हवा आहे. पण ते काही त्याच्यापर्यंत सुरळीत पोहोचत नाही.
या सर्वात आपल्याकडे मध्यस्थ खूपच सुखात आणि समाधानात दिसत आहेत. मूल्य साखळीचा मोठा अभाव आपल्याकडे दिसतो. शेतकरी ते ग्राहक या साखळीमध्ये खूप मोठे काम आपल्याला करावे लागणार आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्याचा खूप मोठा फटका शेतकरी व ग्राहक याच्यावर दिसत आहे. दोन्हीही वर्ग आज समाधानी नाहीत व कोणाकडे ठोस उत्तरही नाही.
किरकोळ विक्रीत भाववाढ झाली की निर्यात बंदीची हत्यारे उपसली जातात. त्यात शेतकरी मारला जातो पण ग्राहकाचा काही फायदा होताना दिसत नाही. कांदा शेतकऱ्याला वीस रुपये भाव मिळाला तर शहरी ग्राहकाला तो साठ रुपये खरेदी करावा लागतो, ही बाजारभावातील तफावत मोठी आहे. हीच गोष्ट प्रत्येक पिकाच्या बाबतीत घडताना दिसत आहे. मात्र या अन्नधान्याच्या व्हॅल्यू चेनवर जर काम झाले, तर भविष्यातील शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा दोन्हीही प्रश्न मार्गी लागतील. त्यासाठी शासनाची, कृषीतज्ज्ञांची, राजकारण्यांची, धोरणकर्त्यांची इच्छाशक्ती हवी. शासनाने व्हॅल्यू चैन वर चांगले काम केले तो प्रश्न जर सुटला जाऊ शकतो मध्यस्थ कमी करून एक चांगली व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. तरच सर्वच सुरळीत होईल.
शेतकऱ्यांना अशी घातली जाते भीती
सध्या असे चित्र आहे की सामान्य शेतकरी जर आपला शेतमाल घेऊन जर शहरात विक्रीसाठी गेला. तर त्याच्यावर बाजारसमित्यांमध्ये हल्ला होणे, त्याला तेथील प्रस्थापित व्यवस्था त्याच्यावर दमदाटी करणे असे प्रकार होत असल्यामुळे शेतकरी त्याने केलेला प्रोडूस शेतमाल शहरात घेऊन जाण्यासाठी घाबरतो. त्याच्यात असलेल्या या भीतीचाच मध्यस्थ फायदा घेतात व दोन्हीही घटकांची लूट त्या ठिकाणी होते. यासाठी कडक कायदे व अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी माफक अपेक्षा शेतकरी करत असतो. (नाशिकच्या पंचवटी बाजार समितीत, मुंबईच्या वाशी बाजार समितीत शेतकऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार पूर्वी घडलेले आहेत.)
परदेशातले मॉडेल
आज अमेरिका किंवा इतर विकसित राष्ट्रांमध्ये व्हॅल्यू चेनवर खूप चांगले काम सुरू असते. ग्राहक कुटुंबासहित शेतकऱ्यांच्या फार्मवर जाऊन खरेदी करतात आणि पिकनिक पॉईंट पर्यटन म्हणून सुद्धा तिथे शेती बहरली आहे. शेतात काय चालतं? शेतीमाल कसा तयार होतो? या सर्व गोष्टींचा माहिती ग्राहकाला व त्याच्या परिवाराला मिळून जाते आणि त्याला एक शाश्वत बॉण्डिंग विश्वासार्हता त्याठिकाणी तयार होते. शेतकरी व ग्राहक यांच्या साठीचं यशस्वी मॉडेल त्या ठिकाणी उभे आहे, विशेषत: युरोपात हे पाहायला मिळते.
शेती अन्नधान्याबरोबर पिकनिक पॉईंट त्या ठिकाणी तयार होताना दिसत आहे. दोन्हीही घटकांना न्याय मिळताना दिसत आहे. आपल्याकडे तुकड्याची शेती आणि ते करणारे छोटे शेतकरी ही खूप मोठी समस्या सद्य:स्थितीत आहे. छोट्या शेतीमुळे आपण यांत्रिकीकरणात खूप मागे आहोत, त्यासाठी एकत्र येऊन काम करून गट शेती व फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून यांत्रिकीकरणासाठी विक्री व्यवस्थेसाठी व प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी खूप मोठा पर्याय प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार होत आहे. या पद्धतीने थोडं नियोजन केले तर आपण जगाच्या स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकून दोन्हीही घटकाची व देशाच्या प्रगतीत खऱ्या अर्थाने आपण योगदान देऊ शकतो.
आमचे प्रोड्युसर कंपनीचे मॉडेल
येवला तालुका व परिसरातील आम्ही 500 शेतकरी एकत्र येऊन 2019 मध्ये कृषी संपदा शेतकरी उत्पादक कंपनी, पाटोदा नावाचा ग्रुप करून पाटोदा व येवला तालुक्यातील शेतकरी शेतकऱ्यांसाठी मोठं काम करत आहोत. आमचे सभासद आज रेसिड्यू फ्री द्राक्ष व भाजीपाला, कारले इत्यादी शेतीमाल विदेशातीलच नाही तर भारतातील जागरूक ग्राहक शोधून त्यांना पुरवठा करतो. त्यात त्याचे समाधान व शेतकऱ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो. आपण भारतीय शेतकरी आणि आपल्याला असलेली निसर्गाची साथ ही जगभरातील सगळ्या देशांपैकी आपल्याला एक देणगी निसर्गाने दिलेली आहे. सगळ्या देशांपेक्षा आपले वातावरण खूप चांगले आहे. तुलनेने खूप कमी आव्हाने आपल्याकडे आहे, पण आपण त्यात तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण व समंजसपणा शेती केली एकत्र येऊन प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग हे जर करू शकलो तरच शेतीतला प्रश्न सुटू शकतो. आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही?
विठ्ठल वाळके,
संचालक, कृषी संपदा शेतकरी उत्पादक कंपनी, पाटोदा, येवला
मो.9623028562