बदललेल्या वातावरणीय परिस्थितीमुळे शेतीसमोर खूप मोठे आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय शेती करणे फायदेशीर ठरणार नाही. प्रिसिजन फार्मिंग चा उपयोग केल्यास सदर आव्हानांवर मात करून योग्य उत्पादन घेता येऊ शकते. अशा तंत्रज्ञांचा वापर केल्यास शेतीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान देखील टाळता येऊ शकते.
भारताचे मिरची उत्पादनातील योगदान
भारतीय मिरचीला रंग व तिखटपणामुळे जागतिक बाजारात अनन्य साधारण महत्व आहे. भारत १.९८ मिलियन टन उत्पन्नासह जगात पहिल्या स्थानावर असून एकूण मिरची उत्पादनात भारताचा ४३ टक्के वाटा आहे. महाराष्ट्र १८.९९ हजार मेट्रिक टनासह भारतात दहाव्या स्थानी आहे, परंतु पारंपारिक शेतीमुळे दिवसेंदिवस मिरचीची प्रति एकरी उत्पादकता कमी होत असून मिरचीची आधुनिक शेती करणे अपरिहार्य झाले आहे.
जमीन आणि हवामान
मिरची लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. जमीन हलकी असल्यास माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केले जाऊ शकते. उष्ण आणि दमट हवामानात पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते तसेच ग्रीन हाऊस मध्ये उत्पादन करून वर्षभर कोणत्याही हंगामात मिरची उत्पादन घेता येऊ शकते.
मिरची रोप निवड
अत्याधुनिक, हरितगृहात वाढवलेले, चांगले उत्पादन देणारे, नामांकित वाणांचे मिरची रोप उपलब्ध करून देण्यात येते. चांगल्या व योग्य वाढवलेल्या रोपामुळे योग्य उत्पादकता घेण्यास मदत होते. सकस रोपांमुळे कीड व रोग नियंत्रणावरील खर्च कमी होतो. सारख्या रोपांमुळे सर्व झाडे एकाच वेळेस उत्पादनक्षम होतात कारण मिरची लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपांवर अवलंबून असते.
अधिक वाचा: कोथिंबीरीपेक्षा धण्यात मिळतोय जास्त नफा, कशी कराल धणे लागवड
गादीवाफा व पॉली मल्चिंगवर लागवड
मिरची मध्ये गादीवाफा वापराची व त्यावर पॉली मल्चिंग ची शिफारस करण्यात येते. त्यासाठी चार फुटाचा गादी वाफा व त्यावर ३० मायक्रॉन पॉली मल्चिंग आदर्श समजण्यात येते. पॉली मल्चिंग सहित गादीवाफ्यामुळे मुळांची लवकर वाढ होते. त्यामुळे रोपे मातीमध्ये लवकर स्थावर होतात. गादीवाफ्यामुळे फर्टिगेशन द्वारे दिलेली खते रोपांना लवकर उपलब्ध होतात व लीचिंगद्वारे खतांचा होणारा अपव्यय टाळता येतो. गादीवाफ्यामुळे जास्तीच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते व जमिनीत हवा खेळती राहते.
पॉली मल्चिंग मुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळता येते व पाण्याची बचत होते तसेच फर्टीगेशन द्वारे दिलेली खते हवेत बाष्पीभवनासोबत उडून न जाता पिकांना उपलब्ध होतात. पॉली मल्चिंग तंत्राद्वारे तण उगवण क्षमता कमी होते व तणांचा नियंत्रणांवरील खर्च कमी होतो. त्यामुळे तणांद्वारे जमिनीतील पाणी व अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेला अटकाव करता येतो व परिणामी पिकांना पाणी व मूलद्रव्य योग्य प्रमाणात उपलब्ध होतात व पाणी व खत व्यवस्थापना वरील खर्च कमी होतो. सूर्यप्रकाश अडवला गेल्यामुळे झाडांच्या मुळाजवळील तापमान नियंत्रित राहते.