Join us

रब्बी पिकांसाठी विना मशागत लागवड तंत्रज्ञान फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:24 AM

विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खणतीने खोदून पिकाची पेरणी करावी. मात्र या पद्धतीमध्ये तण नियंत्रण, बियाणे पेरणी व खते देणे याबाबी मात्र आवश्यक आहेत.

विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खणतीने खोदून पिकाची पेरणी करावी. मात्र या पद्धतीमध्ये तण नियंत्रण, बियाणे पेरणी व खते देणे याबाबी मात्र आवश्यक आहेत. भात कापणीनंतर जमिनीतील ओलाव्यावर रब्बी हंगामातील पिके घेतल्याने अनेक फायदे होतात. बहुतांश शेतकरी भात कापणीनंतर कुळीथ, पावटा, पालेभाज्या, वांगी, हिरवी मिरची लागवड करून उत्पादन घेत आहेत.

जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहिल्याने पिकाच्या वाढीसाठी फायदा होतो. मशागतीचा खर्च कमी होतो. त्यामुळे निव्वळ नफ्यात वाढ होते. तणाचा उपद्रव कमी प्रमाणात होतो. मजूर कमी लागतात. त्यामुळे निविष्ठांच्या खर्चात बचत होते. जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने अशा अंग ओलितावर कडधान्यांसारखी पिके घेता येतात. ओलिताखाली पिके घ्यावयाची झाल्यास ५० टक्के पाण्याची बचत होते. पाण्याची बचत झाल्यामुळे ओलिताखालील क्षेत्रात वाढ होते. मशागतीचा वेळ वाचल्याने पेरणी वेळेवर करता येते. बियाणास ओल भरपूर मिळाल्यामुळे उगवण चांगली होते.

विना मशागत लागवडीसाठी पिकांची निवड करावी. याशिवाय अळी करून ज्या पिकांची लागवड केली जाते अशा पिकांची निवड करावी. यामध्ये वाल, चवळी, कुळीथ, सोयाबीन, मूग यासारखी कडधान्ये, मोहरी, कारळा, तीळ, सूर्यफूल याप्रमाणे गळीत धान्ये तसेच दुधी भोपळा, कारली, घेवडा, कलिंगड, काकडी सारख्या भाजीपाला पिकांची लागवड करणे शक्य होत आहे.

पूर्वीच्या पिकातील तणांचे नियंत्रण करण्यासाठी पॅराक्वॉट ग्रामोक्झोन २४ एस. एल हे बिन निवडक स्पर्शजन्य तणनाशक ६ ते ७ मिली. प्रति लिटर पाण्यातून फवारावे. तणनाशकाची फवारणी पेरणीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर करावी. या पद्धतीमध्ये पिकाची पेरणी खत व बियाणे पेरणी एकाचवेळी करणाऱ्या दोन चाड्याच्या पाभरीच्या सहाय्याने किंवा पेरणी करावयाची झाल्यास खुरप्याच्या किंवा विळ्याच्या सहाय्याने शेजारी दोन टोचे मारावे. एकात बियाणे व दुसऱ्या टोच्यामध्ये खत टाकून मातीने झाकून घ्यावे. कलिंगड, काकडी तसेच इतर वेलवर्गीय भाज्यांसाठी योग्य अंतरावर अळी करण्यासाठी खड्डे काढावेत आणि त्यामध्ये खते देऊन पेरणी करावी. या पद्धतीमुळे वेळ, खर्चाची बचत होत आहे.

सिंचन व्यवस्थापनपिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. तसेच गळीतधान्ये आणि कडधान्यांसाठी अंग ओलिताची कमरता भासल्यास तुषार सिंचन पद्धतीने गरजेनुसार एक किंवा दोन वेळा पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी गुरांना खाण्यासाठी अयोग्य असलेला भाताचा पेंढा, गवत, पालापाचोळा यांचे आच्छादन टाकावे. आच्छादन प्रति हेक्टरी पाच टन याप्रमाणे वापरावे. त्यामुळे बाष्पीभवन रोखले जाईल. तणांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच जमिनीमध्ये पदार्थ वाढविण्यास मदत होत असल्याने या पद्धतीचा अवलंब वाढत आहे.

टॅग्स :शेतीशेतकरीपीकरब्बीभाज्याठिबक सिंचनखते