पेन्सिलने आराखडे आखायचे अन् त्याद्वारे हद्दीच्या खुणा निश्चित करत इटीएस यंत्राच्या आधारे जमिनीचे मोजमाप नाशिक जिल्हा व विभागाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून केले जात होते. मात्र, आता हे काम हळूहळू इतिहासजमा होत असून संगणकीकृत व डिजिटायझेशनच्या वाटेवर हे कार्यालय गतिमान होऊ लागले आहे. नाशिक विभागात समाविष्ट असलेल्या पाच जिल्ह्यांत सुमारे ५८ रोव्हर यंत्रांच्या साहाय्याने जमिनीची मोजणी भूमापक अधिकारी करत आहेत
रोव्हर हे आधुनिक यंत्र उपग्रहाशी (सॅटेलाइट) जोडणी करत मोबाइल डेटा ब्लूटूथच्या साहाय्याने कनेक्ट करत तंतोतंत व अचूक मोजणी, तीदेखील कमी वेळेत करणे भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता सहज शक्य झाले आहे.
काय आहे रोव्हर?
रोव्हर यंत्र उपग्रहाच्याआधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) मोजणी करावयाच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश दर्शविते. त्यावरून ऑटोकॅडसारख्या संगणक प्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर करून जमिनीची मोजणी प्रक्रिया पार पाडली जाते.
अचूक, झटपट होणार मोजणी
रोव्हर या जमीन मोजणी यंत्रामुळे आता जमिनीची मोजणी अचूक आणि कमी वेळेत म्हणजेच केवळ एका तासात एक हेक्टर क्षेत्राचे मोजमाप करणे शक्य आहे. या यंत्रांमुळे प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला सरासरी २ हजार जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढता येणे शक्य होणार आहे. जमीन मोजणी अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे सुकर झाली आहे. रोव्हरच्या वापरामुळे आधुनिक व संगणकीकृत डिजिटल नकाशे सहजरित्या उपलब्ध होतात.
जमीन मोजणीचा कालावधी असा....
जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर साधारण मोजणीसाठी सहा महिने, तातडीने मोजणीसाठी तीन महिने, अतितातडीने मोजणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. जमिनीचे जुने अभिलेख शोधून त्याआधारे मोजणी केली जाते. मोजणीची प्रक्रिया किचकट असल्याने ती वेळेत पूर्ण होईल, याची शाश्वती देता येत नाही. यामुळे नागरिक अनेकदा मेटाकुटीलाही येतात.
रोव्हर ही अत्याधुनिक सॅटेलाईटद्वारे चालणारी यंत्रणा आहे. या यंत्रामुळे जमीन मोजणीची प्रक्रिया अचूक व जलदरित्या होते. नाशिक विभागात रोव्हरचा वापर केला जात आहे. रोव्हरची संख्या जसा निधी उपलब्ध होतो, तशी वाढविण्यावर भर दिला जात आहे. या यंत्राद्वारे मोजणीनंतर संगणकीकृत डिजिटल नकाशा मिळतो.
- चारुशिला चव्हाण, जिल्हा अधीक्षक, संलग्न नाशिक प्रा. कार्यालय उपसंचालक भूमी अभिलेख.