Join us

आता हळद काढणीला येईल लवकर; करा या तंत्रज्ञानाने लागवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 11:37 AM

सिंगल नोड पद्धतीने हळद रोपांचे उत्पादन कमी खर्चात चांगल्या प्रतीची लागवड सामग्री तयार करण्यासाठी आलं तसेच हळदीमध्ये एकच अंकुर (सुमारे २० ग्रॅम) वापरून रोप तयार करण्याचे तंत्र प्रमाणित करण्यात आलं आहे.

हळद (Curcuma longa) हे भारतात उगवले जाणारे एक महत्त्वाचे व्यावसायिक मसाला पीक आहे. मसाला, चव आणि कलरिंग एजंट म्हणून भारतीय पाककृतीमध्ये ते विविध स्वरूपात वापरले जाते. यात कर्करोगविरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म आहेत आणि म्हणून औषध उद्योग आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात त्याचा वापर होतो. 'कुम-कुम (कुंकू)', प्रत्येक गृहिणीमध्ये लोकप्रिय आहे, हे देखील हळदीचे उप-उत्पादन आहे.

कुंकवाला धार्मिक आणि औपचारिक प्रसंगी अर्पणांमध्ये महत्वाचे स्थान आहे. फूड ऑडिटीव्ह म्हणून नैसर्गिक उत्पादनांची वाढती मागणी हळदीला फूड कलरंट म्हणून आदर्श उत्पादन बनवते. हळदीचा उगम दक्षिण आशियातील विशेषतः भारतातील आहे. हळदीची लागवड रायझोम (rhizomes) वापरून केली जाते. लागवडीनंतर साधारण ७ ते ९ महिन्यांत राइझोम काढणीसाठी तयार होतात. भारत हा जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे.

सन २०२२-२३ मध्ये भारतात ११.६१ लाख टन (जागतिक हळदीच्या ७५% पेक्षा जास्त) उत्पादनासह ३.२४ लाख हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली होते म्हणजेच वाळलेली हळद ३५८३ किलो ग्राम प्रति हेक्टर. हळदीच्या ३० पेक्षा जास्त जाती भारतात उगवल्या जातात आणि देशातील २० पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू ही प्रमुख हळद उत्पादक राज्ये आहेत. 

जमिन व हवामानहळद लागवड पावसावर आधारित आणि सिंचन अशा दोन्ही परिस्थितीत करता येते. पेरणीच्या वेळी मध्यम स्वरूपाचा पाऊस, राईझोम अंकुरित होईपर्यंत, वाढीच्या कालावधीत जोरदार आणि चांगले वितरित पाऊस आणि कापणीपूर्वी सुमारे एक महिना कोरडे हवामान आवश्यक आहे. हळद लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य आहे. पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत या पिकांची लागवड करू नये.

लागवड पद्धतीलागवडीसाठी, ३ फूट रुंदीचे आणि कमीत कमी १ फूट उंचीचे गादीवाफे तयार करावे. सुधारित लागवड पद्धतींसह सूक्ष्म सिंचन प्रणाली आणि फर्टीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हळद पिकाचे दर्जेदार उत्पादन घेता येते. आलं तसेच हळद लागवड नेहमी रायझोम वापरूनच केली जाते. त्यासाठी ८ ते १० क्विंटल रायझोम लागतात.

लागवडीचे अंतरदोन ओळीतील अंतर २ फूट व दोन रोपांमधील अंतर १ फूट याप्रमाणे एकरी १५,००० रोपे लागतात. या पिकाला परिपक्व होण्यासाठी ८-९ महिने कालावधी लागतो. सुधारित लागवड पध्दतीचा अवलंब करून हळदीचे सरासरी एकरी १०-१२ टन व आल्याचे एकरी ८ ते १० टन उत्पादन घेता येते

हळदीच्या जातीदेशात अनेक जाती उपलब्ध आहेत आणि त्या बहुतेक त्या ठिकाणाच्या नावाने ओळखल्या जातात. जिथे त्यांची लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने दुग्गीराला, टेकुरपेटा, सुगंधम, अमलापुरम, इरोड लोकल, सेलम, अलेप्पी, मुवटुपुझा आणि लकडोंग या काही लोकप्रिय जाती आहेत. आपल्या कंपनीतील शास्त्रज्ञांनी हळदीच्या २० जातींचे संगोपन केलेले आहे त्या पुढीलप्रमाणे- सेलम, प्रगती, वायगाव, झाशी लोकल, प्रभा, मेघालय लोकल, कुल्लू लोकल, राजेंद्र सोनिया, राजेंद्र सोनाली, फुले स्वरूपा, प्रतिभा, केदारम, सिक्कीम, सुवर्णा, पितांबर, सुदर्शन, रोमा, अलेप्पी सुप्रीम, सिलेक्शन १ व २.

अधिक वाचा: वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान

त्यामध्ये काही जाती लवकर काढणीस येणाऱ्या, काही उशिरा काढणीस येणाऱ्या, काही बुटक्या प्रकारच्या किंवा काही उंच वाढणाऱ्या जाती आहेत. हळदीमध्ये पिवळा रंगासाठी कारणीभूत असलेला घटक म्हणजे कूरकुमीन होय. कंपनीजवळ संग्रहित जातीमध्ये ३ टक्के पासून ८ टक्के कूरकुमीनचे प्रमाण असलेल्या जाती उपलब्ध आहेत. या प्रक्षेत्रावर लावलेल्या २० जातींपैकी सेलम या जातीची जवळपास सर्व प्रकारच्या हळद लागवडीच्या क्षेत्रात/भागात लागवड होते.

सेलम या जातीच्या हळदीचा काढणीसाठी पेरणीपासून ८ ते ९ महिने लागतात व सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब करून सरासरी एकरी १२-१५ टन उत्पादन घेता येते. याचप्रमाणे, भारतीय मसाला संशोधन संस्था (IISR), कालिकत येथून तयार केलेली प्रगती ही नवीन जात आहे. या जातीचा काढणीचा कालावधी फक्त ६ महिने आहे व उत्पादकता एकरी ८ ते १० टन असून या जातीमध्ये कुरकुमीन चे प्रमाण ४.५ ते ५ टक्के एवढे आहे. कमी कालावधीमुळे हळद ऑफ सिझनमध्ये काढली जाईल व दर चांगला मिळू शकतो आणि हळदीनंतर रब्बी/उन्हाळी पीक घेता येऊ शकते.

सिंगल नोड पद्धतीने हळद रोपांचे उत्पादनकमी खर्चात चांगल्या प्रतीची लागवड सामग्री तयार करण्यासाठी आलं तसेच हळदीमध्ये एकच अंकुर (सुमारे २० ग्रॅम) वापरून रोप तयार करण्याचे तंत्र प्रमाणित करण्यात आलं आहे. सिंगल बड पद्धतीने तयार केलेल्या रोपांच्या लागवडीची उत्पादन पातळी पारंपारिक लागवड पद्धतींच्या बरोबरीची आहे. या तंत्रामध्ये प्रोट्रे मध्ये सिंगल बड रायझोमची लागवड व ३०-३५ दिवसात मुख्य शेतात लागवड करणे समाविष्ट आहे. या तंत्रज्ञानाचे फायदे म्हणजे निरोगी लागवड सामग्रीचे उत्पादन आणि डायरेक्ट १ महिन्याचे रोप लावल्यामुळे इष्टतम रोपांची संख्या ठेवणे सहज शक्य आहे ज्यामुळे उत्पन्नात घट येत नाही.

टॅग्स :लागवड, मशागतशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनठिबक सिंचन